हद्दवाढीबाबत काँग्रेस नेत्यांची डबल ढोलकी - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:43 PM2022-04-09T13:43:50+5:302022-04-09T13:45:52+5:30
जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा.
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीबाबत काँग्रेस नेत्यांची डबल ढोलकी सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
भाजपचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचननाम्याचे प्रकाशन करताना ते बोलत हाेते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, हर्षवर्धन पाटील, आमदार प्रसाद लाड, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, राहुल चिकोडे, समरजित घाटगे, चित्रा वाघ, शौमिका महाडिक, माधव भंडारी, केशव उपाध्ये, महेश जाधव उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोल्हापूरसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत. सत्यजित कदम आमदार झाल्यानंतर त्यांनी महिन्याला दिल्लीत जाऊन कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देऊ. पाठोपाठ धनंजय महाडिक यांनाही दिल्लीत पाठविण्याचा आमचा विचार आहे.
सातारा-कोल्हापूर काम कोणामुळे थांबले...
सातारा-कोल्हापूर सहापदरी रस्त्याचे ६ हजार कोटी रुपयांचे काम कोणामुळे थांबले? ते ९ हजार कोटींवर गेले. नितीन गडकरी यांनी तेही मंजूर केले. परंतु हे काम सुरू का होत नाही, हे एकदा जाहीर करा, असे पाटील म्हणाले.
वचननाम्यातील मुद्दे...
- सीएनजी, इलेक्ट्रिक बससेवेसाठी आग्रह
- महामार्गावरून शहरात सुरक्षित प्रवेशासाठी बास्केट ब्रीजसाठी निधी मंजूर
- शहरात प्रमुख ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रीजची निर्मिती
- पंचगंगा प्रदूषण नियंत्रणासाठी नरेंद्र मोदी यांनी निधी मंजूर केला आहे. शहरातील सांडपाणी रोखणार
- रंकाळा प्रदूषणमुक्त करणार
- महिलांसाठी स्वच्छतागृहे
- पर्यटकांच्या सोयीचे कन्व्हेन्शन सेंटर उभे करणार
- सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड
- नव्या अर्बन डिझाईननुसार शहरातील रस्ते व्हावेत असा आग्रह
- शहरांच्या चौकांचे सुशोभिकरण
- बांधकाम व्यावसायिक व वैयक्तिक बांधकामासाठी एक खिडकी योजना