निकालांना ‘डबल एंट्री’ बंदचा फटका!
By admin | Published: March 29, 2015 11:56 PM2015-03-29T23:56:02+5:302015-03-30T00:12:56+5:30
शिवाजी विद्यापीठ : समन्वयातील अभावाने गोंधळ : नव्या पद्धतीतील त्रुटींची दुरुस्ती आवश्यक
कोल्हापूर : निकाल लवकर लागावेत यासाठी यंदा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उत्तरपत्रिकेवरून थेट संगणकावर गुण नोंदविण्याची (फीडिंग) प्रक्रिया राबविली. मात्र, त्यातील काही तांत्रिक त्रुटी, मनुष्यबळाच्या पातळीवरील अंमलबजावणीतील चुकांमुळे त्याचा उलट परिणाम झाला. शिवाय यापूर्वीची ‘डबल एंट्री सिस्टीम’ बंद केल्याचा फटका निकाल वेळेवर लावण्याच्या प्रक्रियेला बसला आहे. ते सध्याच्या परीक्षाविषयक गोंधळाचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते.
निकाल लावण्याच्या प्रक्रियेत यापूर्वी डबल एंट्री सिस्टीम पद्धत कार्यान्वित होती. यामध्ये प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर त्यांना दिलेल्या गुणपत्रिकेत सांकेतिक क्रमांकानुसार ते गुण लिहीत होते. तेथून संबंधित पत्रिका ‘कॅप’कडे गुणपत्रिकेतील फीडिंगसाठी जात होती. शिवाय त्याचे एकत्रित लेजर तयार केले जात होते. यामुळे निकालात चूक झाल्यास ती प्राध्यापकांच्या गुणपत्रिकेत झाली की फीडिंगमध्ये झाली, ते पटकन समजत होते. मात्र, यावर्षी पूर्वीची पद्धत बंद करण्यात आली. तसेच नव्या पद्धतीनुसार तपासलेल्या उत्तरपत्रिकेवरून थेट गुण फीडिंगसाठी पाठविले जातात. या प्रक्रियेत प्राध्यापकांकडील गुणपत्रिका समाविष्ट केली नाही. परीक्षा अर्ज भरताना काही तांत्रिक बाबींमुळे आॅड नंबरची संख्या वाढली. ‘नंबर मास्ंिकग’ केल्याने अशा विद्यार्थ्यांचे गुणांची नोंद करण्यासाठी उत्तरपत्रिकांची शोधाशोध करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे निकाल लागण्याची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. नवी पद्धत वेळ वाचविणारी असली, तरी त्यातील काही त्रुटींमुळे, तिच्या अंमलबजावणीतील चुका टाळून ती कार्यन्वित करणे महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. (प्रतिनिधी)
गोंधळाला हे घटक कारणीभूत
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून (एमकेसीएल) माहिती मिळविणे अथवा त्यांना पाठविण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी, महाविद्यालयांतील अर्ज भरताना, गुणांची नोंद करण्याच्या प्रक्रियेतील चुका, विद्यार्थ्यांनी केलेल्या विषयांच्या बदलाची नेमक्या यंत्रणेला माहिती नसणे, आदी घटक आणि एकूणच प्रक्रियेतील समन्वयाचा अभाव हे घटक विद्यापीठात सध्या निकालाबाबतच्या गोंधळाला कारणीभूत आहेत का? हे तपासणे गरजेचे आहे.
नेमक्या चुकांचा शोध घ्यावा
‘एमकेसीएल’चे प्रतिनिधी, विद्यापीठातील संगणक विभाग आणि प्रत्यक्ष निकाल लावणाऱ्या प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित बैठक घ्यावी. नेमक्या चुकांचा शोध घ्यावा. अर्ज करणे ते गुणपत्रिकांच्या निर्मितीपर्यंतच्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घ्यावा. त्यातील आढळणाऱ्या त्रुटींची दुरुस्ती व्हावी.
‘एक्झाम आॅटोमेशन’ बंद का?
संगणक आणि परीक्षा विभाग सक्षम होण्यासाठी सहा वर्षांपूर्वी विद्यापीठाने लाखो रुपये खर्चून एक्झाम आॅटोमेशन सॉफ्टवेअर विकसित केले. त्याअंतर्गत काही परीक्षांच्या निकालाचे काम विद्यापीठ आणि अन्य ‘एमकेसीएल’द्वारे चालत होते. त्यातून निकाल वेळेत लागत होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या सॉफ्टवेअरचा वापर होत नाही. ‘एमकेसीएल’समवेतचा करार संपल्यास विद्यापीठाला पुन्हा या सॉफ्टवेअरच्या वापराशिवाय पर्याय नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.