कोल्हापूर ‘दिलबहार’चा डबल धमाका ; खंडोबा, उत्तरेश्वर पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:23 PM2018-11-28T13:23:22+5:302018-11-28T13:25:08+5:30
के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
कोल्हापूर : के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी दिलबहार ‘अ’ व ‘खंडोबा ‘अ’ यांच्यात सामना झाला.
सामन्यांच्या प्रारभापासून दोन्ही संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात धडक मारत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दिलबहार ‘अ’कडून इमॅन्युअल, जावेद जमादार, सूरज शिंगटे, अकिल पाटील, अमोस अडिसा यांनी खोलवर चढाया केल्या; तर ‘खंडोबा’कडून कपिल शिंदे, अॅँड्र्यू बुरटाल, रणवीर जाधव, ऋतुराज संकपाळ, श्रीधर परब यांनीही तितक्याच तोडीस तोड खेळ करीत प्रतिआक्रमण केले. मात्र, दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल करता आला नाही.
उत्तरार्धात ६८ व्या मिनिटाला सेंटरपासून दिलबहार ‘अ’च्या अनिकेत तोरस्करने गोलरक्षक रणवीर खालकर पुढे आल्याची संधी साधत चेंडू अलगदपणे त्याच्या डोक्यावरून मारला आणि हा पहिला गोल नोंदविण्यात दिलबहार ‘अ’ला यश आले. या गोलनंतर ७२ व्या मिनिटाला ‘दिलबहार’कडून सनी सणगरने दुसरा गोल करीत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. हीच आघाडी दिलबहार ‘अ ’ संघाच्या विजयास कारणीभूत ठरली.
दिलबहार ‘ब’ व उत्तरेश्वर वाघाची तालीम यांच्यात झालेल्या सामन्यात दिलबहार ‘ब’नेही २-० अशा गोलफरकाने विजय मिळविला. ३८ व्या मिनिटाला दिलबहार (ब)कडून शुभम माळीने गोल करीत संघास १-० आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ५१ व्या मिनिटाला पुन्हा दिलबहार ‘ब’कडून रोहन दाभोळकरने गोल करीत ही आघाडी २-० अशी भक्कम केली. ‘उत्तरेश्वर’कडून सॅबेस्टिनी, स्वप्निल पाटील, स्वराज्य पाटील यांनी आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. दिलबहार ‘ब’कडून स्वप्निल भोसले, सतेज साळोखे, आकाश पोरे यांनी उत्कृष्ट चाली रचल्या. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्याने दिलबहार ‘ब’नेही विजयी सलामी दिली.
आजचे सामने
दुपारी २ वाजता : संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलीस
दुपारी ४ वाजता : पाटाकडील (अ) विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ