दामदुप्पट योजना : फसवणुकीला चाप, नवी गुंतवणूक थांबली..एजंटांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 04:28 PM2021-11-23T16:28:25+5:302021-11-23T16:28:59+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : फसव्या दामदुप्पट योजनेला लोकांनी बळी पडू नये या उद्देशाने लोकमतमध्ये असे करणाऱ्या कंपन्यांच्या फसवेगिरीचा गेली ...

Double plan Fraud is suppressed new investments are stopped Agents are worried | दामदुप्पट योजना : फसवणुकीला चाप, नवी गुंतवणूक थांबली..एजंटांची चिंता वाढली

दामदुप्पट योजना : फसवणुकीला चाप, नवी गुंतवणूक थांबली..एजंटांची चिंता वाढली

Next

विश्वास पाटील
कोल्हापूर : फसव्या दामदुप्पट योजनेला लोकांनी बळी पडू नये या उद्देशाने लोकमतमध्ये असे करणाऱ्या कंपन्यांच्या फसवेगिरीचा गेली आठवडाभर भांडाफोड केल्यानंतर आता या योजनांमध्ये होणारी नवीन गुंतवणूक थांबली असल्याचे चित्र आहे. अनेक गावांतून तशी माहिती उपलब्ध झाली आहे. जे दिवस उजाडल्यापासून या योजनांची भुरळ घालून गुंतवणुकीसाठी लोकांना आग्रह करत होते अशा एजंट लोकांना आता घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. ज्यांनी यापूर्वीच गुंतवणूक केली आहे त्यांनीही व्याज राहू दे आमची मुद्दल तेवढी दे म्हणून तगादा सुरु केला आहे.

या कंपन्या बोगस असल्याच्या बातम्या लोकमतमध्ये सुरू झाल्यावर गुंतवणूकदार त्याचे स्पष्टीकरण त्यांनी ज्यांच्याकडे पैसे दिले त्यांच्याकडे मागू लागले आहेत. त्यांच्याकडे कंपन्याच्या व्यवहाराबद्दल सांगण्यासारखे काहीच नाही. सुरुवातीला एक-दोन दिवस त्यांनी काहीतरी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली. आता सांगण्यासारखे काहीच नसल्याने हे लोक गुंतवणूकदारांपासून लांब पळत आहेत. काहीजण तर घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. परवा कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथे लोकांनी मुद्दल परत देण्यासाठी तगादा लावला तसाच तगादा आता अन्य गावांतूनही सुरु झाला आहे.

कंपन्यांची नावे आणि योजनेचे स्वरुप वेगवेगळे असले तरी मूळ उद्देश दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक असाच आहे. काही कंपन्या परताव्याच्या जोडीला दुकानांतील मालावरही सवलत देत आहेत. लोकांकडून गोळा होणारी रक्कम आम्ही शेअर्स मार्केटमध्ये गुंतवून त्यातून प्रचंड नफा कमवून तो लोकांना देत असल्याचे या कंपन्यांचे सांगणे आहे; परंतु ते साफ खोटे आहे. अशी गुंतवणूक ते कोणत्या कंपन्यामध्ये करतात त्याचा ओ की ठो गुंतवणूकदारांस माहीत नाही. शेअर्स मार्केटमधील गुंतवणूक ही पूर्णत: गुंतवणूकदाराच्या जोखमीवर असते. तिथे कोणतीच कंपनी अथवा व्यक्ती अमूक टक्के परतावा देतो अशी हमी देऊ शकत नाही. तरीही या कंपन्या राजरोसपणे तीन वर्षांत दामदुप्पट योजनांचे आमिष दाखवून पैसे गोळा करत होत्या. लोकांकडून गोळा केलेले पैसेच गाड्या भेट, सहली, जंगी पार्ट्यावर खर्च करून त्यातून लोकांना आकर्षित करायचे व त्यांच्या खिशातील पैसे काढून घ्यायचे असा हा व्यवहार होता. जे लोक गुंतवणूक करत होते, त्यांना या कंपन्यांच्या व्यवहाराबद्दल पूर्ण अज्ञान आहे. कोण आम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करतो असे सांगतो, कोण ऑईल कंपन्यांमध्ये सांगतोय, काही तालुक्यांत तर गोव्यात कॅसिनोमध्ये आमचे लोक पैसे मिळवतात ते तुम्हाला समजणार नाही असेही कंपन्यांचे लोक सांगत आहेत. म्हणजे जुगारात पैसे मिळवून ते लोकांच्या भल्यासाठी देण्याचे पुण्यकाम हे लोक करत आहेत. या सगळ्या फसवणुकीला आता प्रतिबंध बसला आहे.

सगळेच थंडावले..

- या योजनांमध्ये शिक्षक, महावितरणचे कर्मचारी ग्रामसेवकापासून ते व्यापारी, व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. पती-पत्नी माध्यमिक शिक्षक आहेत व एकाच शाळेत असणाऱ्यांची गुंतवणूकही मोठी आहे.

- लोकमतमध्ये ही वृत्तमालिका सुरु होण्यापूर्वी गावोगावी फक्त आज अमक्याने एवढे गुंतवले, त्याला सहा लाखांची गाडी मिळाली, उद्या त्याला बुलेट मिळणार आहे अशीच चर्चा घुमत होती. आता हे सगळे थंडावले आहे.

Web Title: Double plan Fraud is suppressed new investments are stopped Agents are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.