महापालिका निवडणूक होण्याबाबत पुन्हा साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:07+5:302021-02-25T04:31:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातही काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. एकीकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू असताना आणि ही निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, असे वातावरण असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव वाढला तर निवडणूक होणार का, या प्रश्नाने इच्छुक उमेदवार धास्तावले आहेत.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक मागच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना संसर्गामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे १५ नोव्हेंबरपासून सहा महिन्यांकरिता आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. १४ मे पर्यंत प्रशासक कारकीर्द असणार आहे. स्वाभाविकच तत्पूर्वी महापालिकेची निवडणूक घेणे बंधनकारक आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना, आरक्षण, प्रारूप तसेच अंतिम मतदार याद्या निश्चित करण्याचे काम सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या तारखांचा विचार करता एप्रिल महिन्यात ही निवडणूक होईल, असे दिसते. परंतु अचानक कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्यामुळे पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. संसर्ग वाढला तर निवडणूक होईल का, असा प्रश्न इच्छुक उमेदवार उपस्थित करत आहेत. जसे इच्छुक संभ्रमात आहेत, तसेच प्रशासकीय यंत्रणाही संभ्रमात आहे. काही नेत्यांनी इच्छुकांना फार खर्च करू नका, निवडणुकीचे अजून काही खरे नाही, असे सांगिल्याने त्याबद्दल साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.