‘राष्ट्रवादी’च्या भुदर‘गड’ची पडझड

By admin | Published: September 18, 2015 10:42 PM2015-09-18T22:42:44+5:302015-09-18T23:12:43+5:30

के. जी. नांदेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार : पश्चिम भागात के. पी. पाटील गटास धक्का

The downfall of the Bhaderagad of NCP | ‘राष्ट्रवादी’च्या भुदर‘गड’ची पडझड

‘राष्ट्रवादी’च्या भुदर‘गड’ची पडझड

Next

शिवाजी सावंत - गारगोटी  भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागाचे नेते आणि ‘बिद्री’चे विद्यमान संचालक के. जी. केरबा नांदेकर हे राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून, राष्ट्रवादी पक्षाच्या या विभागातील मक्तेदारीस सुरुंग लागणार आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे पक्ष सोडणे हे पक्षास परवडणारे नाही. पश्चिम विभागावर के. जी. नांदेकरांचे वर्चस्व हे निर्विवाद आहे. यामुळे माजी आमदार के. पी. पाटील गटास हा मोठा हादरा ठरणार आहे.
गेली अनेक वर्षे सत्तेत असणारे के. जी. नांदेकर यांनी राजकीयदृष्ट्या आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. तालुक्याचा पश्चिम भाग हा दुर्गम आणि डोंगराळ असल्याने अविकसित आहे. या विभागातील जनतेचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास करण्यास नांदेकर सतत प्रयत्नशील राहिले. लोकांचा प्रचंड संपर्क आणि कामे केल्यामुळे लोकांनी त्यांना ‘कोेकण केसरी’ ही पदवी दिली. गेली अनेक वर्षे ते ‘बिद्री’च्या माध्यमातून सत्तेत आहेत, तर मुलगा बाबा नांदेकर पंचायत समिती विद्यमान सदस्य व माजी सभापती आहेत. पूर्वी ते माजी आमदार दिनकरराव जाधव गटात काँग्रेसचे काम करीत असत; पण २५ मे १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी नांदेकर के. पी. पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत दाखल झाले. २००९ साली आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत काम करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लेमनराव निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बी. एस. देसाई, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य मधुकर देसाई यांच्यासह अनेकांनी के. पी. पाटील यांच्याशी फारकत घेतली होती. त्यावेळी पक्षात उभी फू ट पडली होती; पण के. जी. नांदेकर हे के. पीं.च्या सोबत राहिले होते. त्यांच्याकडे पश्चिम भागातील मतांचा असणारा गठ्ठा आणि अधिक उमेदवाऱ्यांमुळे २००९ साली पुन्हा विधानसभा विजयी होण्यात के. पी. यशस्वी झाले; पण २0१४ च्या निवडणुकीत आमदार प्रकाशराव आबिटकर हे प्रचंड मतांनी विजयी झाले.
भुदरगड तालुक्यात राष्ट्रवादीची पकड तशी मजबूत आहे; पण के. जी. यांच्या जाण्याने राष्ट्रवादी अडचणीत येणार आहे. राष्ट्रवादी स्थानिक पातळीवरील नेत्यांना मोडण्यासाठी त्याच गावातील, त्याच शहरातील दोन नंबर फळीतील नेत्याला एखादे पद देऊन एक नंबरला नेल्याने महत्त्व कमी करण्यावर विशेष भर देत. याशिवाय के. जी. नांदेकर यांना ‘बिद्री’चे उपाध्यक्षपद हवे होते, असे कारण समजते. सभापती विलास कांबळे हे के. जी. नांदेकर गटाचे कार्यकर्ते आहेत. पंचायत समितीच्या निवडणुकीत के. जी. यांनी त्यांच्या तिकिटासाठी आग्रह धरून निवडून आणले. त्यानंतर ते सभापती झाले. ‘गोकुळ’चे तिकीट के. पी. पाटील यांनी विलास कांबळे यांना दिले. यामध्ये विलास कांबळे विजयी झाले. येथेच ‘माशी शिंकली’ अशी चर्चा सुरू आहे.
तरी के. जी. विरुद्ध के. पी. असा संघर्ष सुरू झाला आहे. मेळावे, प्रतिमेळावे, गाठीभेटी, उणेदुणे जेवणावळी सुरू असून, आपले म्हणणे कसे बरोबर आहे, हे पटविण्यासाठी दोन्ही बाजूंनी कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे.
नांदेकर यांचे जाणे पक्षाला परवडणारे नाही. कारण आता लवकरच ‘बिद्री’ची निवडणूक जाहीर होणार आहे. नांदेकर नेमके कोणत्या पक्षात जाणार? आमदार आबिटकर हे त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी की, माजी आमदार बजरंग देसाई हे काँग्रेसमध्ये की, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भाजपमध्ये आणण्यास यशस्वी होणार? हे लवकरच समजेल. याविषयी तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: The downfall of the Bhaderagad of NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.