सिटी सर्व्हेचा सर्व्हर डाऊन; कामकाज ठप्प
By admin | Published: June 17, 2015 12:20 AM2015-06-17T00:20:01+5:302015-06-17T00:38:32+5:30
कर्मचारी घेतात बसून पगार : दोन आठवडे नागरिक मारताहेत हेलपाटे; वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर
कोल्हापूर : ‘आंधळी प्रजा आणि दळभद्री राजा’ असल्यास राज्याचा कारभार कसा होईल, हे काही वेगळे सांगायला नको. कारभारात केवळ सुंदोपसुंदीच निर्माण होईल. अगदी असाच कारभार गेल्या दोन आठवड्यांपासून येथील सिटी सर्व्हे कार्यालयात सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी रजेवर, संगणक प्रिंटर खराब, सर्व्हर डाऊन अशा विविध कारणांनी येथील कामकाज ठप्प असल्याने येणाऱ्या नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, परंतु याचे सोयरसुतक नसलेले कर्मचारी ‘तांत्रिक’कारण देत निवांत बसून पगार घेत आहेत.
भाऊसिंगजी रस्त्यावर असलेले सिटी सर्व्हे कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे शासकीय कार्यालय आहे. प्रॉपर्टीकार्डच्या नकला, मोजणीच्या नोंदी अशा कारणांनी नेहमी या कार्यालयाशी नागरिकांचा संपर्क येत असतो, परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांना वेगळाच अनुभव येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या कार्यालयातील कामकाज संगणकावर होत आहे. त्यामुळे कामात गती आली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांत संगणकाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रिंटर खराब झाला आहे. सर्व्हर डाऊन झाला आहे, पण हे काम तातडीने पूर्ण करून घेणे कार्यालय प्रमुखांची जबाबदारी असतानाही त्यांनी ती नीट पार पाडलेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात एन.आय.सी. विभागाकडे तक्रार करून तातडीने सर्व्हरमधील दोष दूर करणे आवश्यक होते, परंतु या कार्यालयातून तोंडी तक्रार करण्यात आली होती. एन.आय.सी.मधील अधिकारी कर्मचारी सतत दौऱ्यावर राहिल्याने या तक्रारीकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.
नवीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांची कामे तातडीने झाली पाहिजेत यासाठी सेवाधिकाराच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सध्या तरी सर्वच शासकीय कार्यालयांत नागरिकांना हेलपाटे मारावे लागतच आहेत. (प्रतिनिधी)
मंगळवारी या कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल विचारणा केली असता येथील अधिकारी सुवर्णा पाटील यांनी आपण गेल्या दहा दिवसांत रजेवर असल्याच्या मुदतीत ही गैरसोय झाल्याचे सांगितले. श्रीमती पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन तातडीने आजच्या आज सर्व्हरचा प्रश्न सुटला पाहिजे आणि तोपर्यंत झेरॉक्स मारून नागरिकांना दाखले द्या, अशा सक्त सूचना दिल्या तसेच मी रजेवर असताना तुम्ही काहीच का हालचाली केल्या नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सहकाऱ्यांची कानउघाडणी केली.