डॉ. गवस यांच्या नावाने फसवणाऱ्या ठगास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:22+5:302021-07-23T04:16:22+5:30
गारगोटी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलगीच्या नावे बनावट व्हाॅट्सॲप खाते उघडून मुलींना त्रास देणाऱ्या ...
गारगोटी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलगीच्या नावे बनावट व्हाॅट्सॲप खाते उघडून मुलींना त्रास देणाऱ्या संग्राम यशवंत देसाई (२५) (रा अंतुर्ली, ता. भुदरगड) याला अटक करण्यात आली. अंतुर्ली येथील संग्राम यशवंत देसाई याने डॉ. राजन गवस यांच्या मुलगा व मुलीच्या नावाने या मोबाइल क्रमांकावरून बनावट व्हाॅट्सअॅप अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटवरून तो गेल्या दीड वर्षापासून मुला-मुलींशी चॅटिंग करीत होता.
आपण डॉ. गवस यांच्या घरी राहत पुस्तक लिहीत असल्याचा कांगावा करत होता. पुण्यामध्ये डॉ. गवस यांच्या मुलीचे ऑफिस असून या ठिकाणी पुस्तके प्रकाशित केली जातात. या ऑफिसमध्ये नोकरी असल्याचे तो मुलींना सांगून जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होता. दोन मुलींना त्यांने बँकेचे धनादेशदेखील दिले आहेत. मुलीशी चॅटिंग करताना गवस यांची मुलगी चॅटिंग करते असे तो भासवत होता. मोबाइलवर तो स्वत: बोलत नव्हता. फक्त चॅटिंग करत होता.
गेल्या महिन्यात एका युवतीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर तिने डॉ. गवस यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. गवस यांनी २४ जून रोजी भुदरगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिना होत आला तरी पोलिसाकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात होते. त्या तरुणावर गुन्हा दाखला झालेला नव्हता आणि तपास होत नव्हता. माध्यमांनी हा प्रकार उचलून धरल्यानंतर पोलिसांनी तातडीने देसाई याला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संग्राम देसाई याने बनावट खात्याचा आधार घेऊन चॅटिंग केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या युवकाने कोणाची फसवणूक केली असल्यास भुदरगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
फोटो : २२ संग्राम देसाई