Kolhapur news: माणगावातील आंबेडकर स्मृती प्रकल्प धूळ खात पडून, उद्घाटनासाठी नेत्यांना नाही वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:11 PM2023-03-27T14:11:40+5:302023-03-27T14:12:08+5:30
माणगाव येथे २० मार्च १९२० रोजी परिषद झाली होती. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाकडून त्याआधीच सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला
समीर देशपांडे
कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांची ऐतिहासिक भेट ज्या माणगाव परिषदेत झाली, त्याच माणगाव, ता. हातकणंगले येथे डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीनिमित्त उभारण्यात आलेला प्रकल्प गेले तीन वर्षे धूळ खात पडून आहे. केवळ नेत्यांना वेळ नाही म्हणून या प्रकल्पाचे उद्घाटन रखडले असून, लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
माणगाव येथे २० मार्च १९२० रोजी परिषद झाली होती. याचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाकडून त्याआधीच सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आला. जेथे ही परिषद झाली त्या ठिकाणी एक छाेटे सभागृह उभारण्यात आले आहे. जवळच आंबेडकर यांच्या लंडनमधील घराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली ही देखणी इमारत लक्षवेधी ठरली आहे.
याच परिषदेमध्ये शाहू महाराज उपस्थित हरिजन बांधवांना म्हणाले होते की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. शाहू महाराजांचे हे भविष्य वास्तवात आले. त्यामुळेच ही परिषद महत्त्वाची मानली जाते. परंतु नेते मंडळींना वेळ नसल्याने या प्रकल्पाचेच उद्घाटन रखडले आहे. याचे कोणालाही सोयरसुतक नाही.
होलिओग्राफिक शोची यंत्रणा पडूनच
या ठिकाणी ४० जणांना पाहता येईल अशी बैठक व्यवस्था करून माणगाव परिषदेचा होलिओग्राफिक शो दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून आपण त्या परिषदेमध्ये आहोत असा अनुभव या ठिकाणी घेता येतो. परंतु उद्घाटनच नसल्याने ही यंत्रणाही पडूनच आहे.
ठाकरे गेले, शिंदे आले
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी त्या वेळी प्रयत्न सुरू होते. परंतु पहिल्यांदा कोरोना आणि नंतर ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने हा हे लोकार्पण झाले नाही. परंतु नेत्यांच्या हस्ते उद्घाटन न करता हा प्रकल्प लवकर होणे आवश्यक असताना त्याबद्दल आमदार, खासदार, अन्य लोकप्रतिनिधीही गप्पच आहेत.
या प्रकल्पाचे अजून लोकार्पण झालेले नाही. हा प्रकल्प अजून शासनाकडून ग्रामपंचायतीच्या ताब्यात आलेला नाही. - राजू मगदूम, सरपंच, माणगाव