डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पत्राचा पनोरी येथे शतकमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:57+5:302021-08-24T04:27:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये असताना आपल्या पुढील शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी त्यांच्या दरबारातील चित्रकार ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये असताना आपल्या पुढील शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी त्यांच्या दरबारातील चित्रकार दत्तोबा दळवी यांना पाठवलेल्या पत्रातून केली होती. या पत्रामुळेच आंबेडकरांना शिष्यवृत्ती मिळाली आणि पुढचा इतिहास घडला. या घटनेस नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाल्याने दलित जनतेने अपार श्रद्धेने दळवी यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दळवी यांचे नातू पनोरी येथील नंदकुमार सूर्यवंशी-सरकार यांच्या घरी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर व दळवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या पत्राच्या प्रतिमेला अभिवादन केले. तालुकाध्यक्ष संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेश पाटील, सचिन कांबळे व अशोक कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली, तर प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांची ऐतिहासिक भेट, दोघांमधील स्नेह व शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी दळवी यांनी केलेले प्रयत्न, यावर सविस्तर विवेचन केले.
फोटो ओळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पत्राच्या शतकमहोत्सव समारंभावेळी पणन महासंघाचे सदस्य नंदकिशोर सूर्यवंशी, चंद्रशेखर कांबळे, संजय कांबळे, तुकाराम परीट.