डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला 'एनएबीएच'ची अधिस्वीकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:50+5:302021-05-08T04:23:50+5:30
कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'नॅशनल ॲक्रिडिटेशन ...
कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी 'नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ॲन्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर' (एनएबीएच) ची अधिस्वीकृती मिळाली आहे. हॉस्पिटलच्या विश्वासार्ह सेवेला मिळालेली ही पोचपावती असून भविष्यात अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली. रुग्ण सेवेला सर्वोच्च प्राधान्य देऊन अचूक निदान व किफायतशीर दरात योग्य उपचार यामुळे हॉस्पिटलने वेगळी ओळख निर्माण केल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
'एनएबीएच'च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलकडून दिल्या जात असलेल्या गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह रुग्णसेवेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या पुढील काळात रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही डॉ. संजय पाटील यांनी दिली.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी यांनी 'एनएबीएच'च्या अधिस्वीकृतीमुळे हॉस्पिटलच्या विश्वासार्हतेत अधिक वाढ होईल व त्याचा फायदा रुग्णांनाच होईल, असे सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाचे हे यश असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा यांनी 'एनएबीएच'च्या मान्यतेमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी अधिकच वाढली असून सांघिक प्रयत्नातून ती निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त केला.
वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी एनएबीएचच्या कार्यपद्धतीची माहिती देताना रुग्णांना सर्वोत्तम आरोग्यसेवा मिळवून देणे, रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, सर्व प्रकारच्या सरकारी, निमसरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी “रुग्णालये व आरोग्यसेवेसाठीचे राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळ' (एनएबीएच) कार्यरत असल्याचे सांगितले. रुग्णालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, सेवा, उपचार या सर्व बाबी लक्षात घेऊनच अशा प्रकारची मान्यता 'एनएबीएच'कडून दिली जाते. 'एनएबीएच'ची अधिस्वीकृती मिळवण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, सहायक कुलसचिव अजित पाटील, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुहासिनी राठोड, अधीक्षिका चोपडे, समन्वय समितीचे डॉ. बी. सी. पाटील यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.