डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रा मिरवणुकीतून समतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:42 AM2019-05-13T11:42:55+5:302019-05-13T11:45:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता.
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या ऐक्याचे दर्शन घडविणारी समतेची सम्यक ऐक्य मिरवणूक दसरा चौकातून उत्साही वातावरणात काढण्यात आली. साथीला पारंपरिक ढोल-ताशा, हलगीचा कडकडाट होता.
ही मिरवणूक डॉ. बाबासाहेबांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचा जयघोष करण्यात आला.
आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता दसरा चौकातून या मिरवणुकीचा प्रारंभ झाला. मिरवणुकीत ढोल-ताशा, लेझिम या वाद्यांसह हलगीच्या कडकडाटात नेते, कार्यकर्ते व महिला डोक्यावर निळे फेटे व गळ्यात निळे स्कार्फ घालून उत्साहाने सहभागी झाले होते.
मिरवणूक दसरा चौकातून सुरू होऊन बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौकात येऊन विसर्जित झाली. मिरवणुकीतील अश्वरथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहासनारूढ पुतळा बसविला होता. यासह ‘भारत का संविधान, अर्थात संविधानाचा जागर’ हा फलक, मराठा महासंघातर्फे सामील करण्यात आला होता. विशेषत: या मिरवणुकीतून सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले.
यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष सखाराम कामत, उपाध्यक्ष सुरेश कांबळे, सहसचिव अविनाश शिंदे, जयसिंग जाधव, दगडू भास्कर, प्रा. विश्वास देशमुख, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, सुखदेव बुदिहाळकर, सुभाष देसाई, अॅड. पंडित सडोलीकर, मल्हार सेनेचे बबन रानगे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, प्रकाश सातपुते, बाळासाहेब भोसले, भाऊसाो काळे, टी. एस. कांबळे, अविनाश शिंदे, नंदकुमार गोंधळी, आदी सहभागी झाले होते.
सायंकाळी सहा वाजता आंबेडकरवादी मान्यवर नेत्यांनी जाहीर सभेत मार्गदर्शन केले, तर सात वाजता ‘वादळ वारा फेम’ अनिरूद्ध बनकर यांचा ‘भीम-बुद्ध’ हा भीम गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
‘फुले-शाहू-आंबेडकर’ ऐक्याचा देखावा
मिरवणुकीत एका ट्रॉलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या वेशभूषा केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
लक्षवेधी फलक
राष्ट्रपुरूषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नका, ‘जातिभेद गाढा भारत देश जोडा’ हा फलक अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मिरवणुकीत सामील करण्यात आला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.