Kolhapur: ‘नको सावकार, नको आबा पन्हाळा-शाहूवाडीला हवा पर्याय नवा; जयंत पाटील यांच्या व्हिडीओने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 05:55 PM2024-09-09T17:55:41+5:302024-09-09T17:56:21+5:30
दुरंगी लढतीत तिसरा आल्यास चुरस वाढणार
कोल्हापूर : ‘नको सावकार, नको आबा पन्हाळा-शाहूवाडीला हवा पर्याय नवा,’ अशी टॅगलाइन देऊन शनिवारी डॉ. जयंत प्रदीप पाटील यांचा व्हिडीओ कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याने मतदारसंघात खळबळ उडाली. डॉ. पाटील यांना त्याबद्दल विचारणा केल्यावर त्यांनी त्यास थेट नकार दिला नाही. कार्यकर्त्यांनी कुणीतरी व्हिडीओ व्हायरल केला असेल, आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत, अजून निवडणुकीस अवधी आहे, बघू पुढे काय होतंय, अशी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या मतदारसंघात विधानसभेला महायुतीकडून जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे विरुद्ध महाविकास आघाडीतून उद्धवसेनेचे सत्यजित पाटील यांची लढत होत आहे. लोकसभेलाही सत्यजित पाटील विरुद्ध धैर्यशील माने या लढतीत या मतदारसंघाने सत्तेची प्रचंड ताकद असतानाही सत्यजित पाटील यांना १९ हजार मताधिक्य दिले. त्यात शाहूवाडीने त्यांना २२ हजार ३७७ मताधिक्य दिले. ३४८० मतांनी ते पन्हाळ्यात मागे राहिले. या मतदारसंघात कोरे विरुद्ध सत्यजित अशीच दुरंगी लढतीची चिन्हे आजतरी आहेत.
परंतु डॉ. जयंत पाटील यांनी शड्डू ठोकलाच तर ते आमदार कोरे यांना अडचणीचे ठरणार आहे. डॉ. पाटील हे उच्च शिक्षित आहेत. दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा राजकीय वारसा आहे. शैक्षणिक संस्थांचे बळ पाठीशी आहे. त्यामुळे त्यांनी काही भूमिका घेतली तर या मतदारसंघातील चुरस वाढू शकते.
शाहूवाडीत सत्यजित यांना पाठबळ मिळते. पन्हाळ्यात आल्यावर आमदार कोरे त्यांचे मताधिक्य फेडून गुलाल लावतात, असे यापूर्वी घडले आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत त्यांनी पन्हाळ्यातून आपल्या मतांची वजावट होऊ नये, यासाठी रिंगणात कोण राहणार नाही, याची दक्षता घेतली.
विधानसभेच्या २०१४च्या लढतीत अमर यशवंत पाटील यांनी ‘स्वाभिमानी’कडून लढून २७,९५३ मते घेतली. बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर हे राष्ट्रवादीकडून ४६७१ मते घेतली. कर्णसिंह गायकवाड रिंगणात असूनही त्या लढतीत सत्यजित पाटील निवडून आले. कारण, पन्हाळ्यातच सुमारे ३२ हजार मतांचा फटका कोरे यांना बसला. त्यामुळे या निवडणुकीतही एकास एक लढतच व्हावी, यासाठीच कोरे यांचे प्रयत्न सुरू असताना डॉ. पाटील यांच्याबद्दलची पोस्ट चर्चेत आली.