मराठीचा ग्लोबल ठसा, कोल्हापूरच्या कुमार ननावरेंच्या आत्मचरित्राला राष्ट्रीय पुरस्कार; गोल्डनबुक ॲवार्डप्राप्त एकमेव मराठी पुस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:26 PM2022-02-19T13:26:51+5:302022-02-19T14:23:27+5:30
कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
संदीप आडनाईक
कोल्हापूर : कोल्हापुरातील डॉ. कुमार दत्तात्रय ननावरे यांच्या मराठी आत्मचरित्राला यावर्षीचा ‘गोल्डनबुक ॲवार्ड’ हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठीने ग्लोबल ठसा उमटवला आहे.
या पुरस्कारामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, हा पुरस्कार मिळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय साहित्यिकांमध्ये डॉ. ननावरे हे एकमेव मराठी लेखक तर आहेतच, याशिवाय ३५ पुस्तकांमध्ये एकमेव मराठी भाषेतील पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.
त्वचारोगतज्ज्ञ कुमार ननावरे यांनी ‘मी सरकारी डॉक्टर’ या पुस्तकात ३३ वर्षे सरकारी नोकरीत आलेल्या अनुभवांची मांडणी केली आहे. सध्या जीवबानाना जाधव पार्क येथे राहणारे डॉ. ननावरे १९९८ ते २००३ या कालावधीत कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी होते.
२०१९मध्ये प्रकाशित केलेल्या या आत्मचरित्रात त्यांनी ढासळणारी सरकारी आरोग्य सेवा, सरकारी डॉक्टरांची ८० टक्के रिक्त पदे, डॉक्टरांना मारहाण, हनी ट्रॅप, सेव्ह डॉक्टर आदी मुद्दे मांडले. या पुस्तकावर डॉ. विकास आमटे यांच्यासह अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पुस्तकाला २०१९मध्ये साहित्य संपदा समूहाचा ‘पुस्तकरत्न पुरस्कार’ मिळालेला आहे. याशिवाय डॉ. ननावरे यांचे दहा हजार शवविच्छेदनावर आधारित ‘पोस्टमार्टम ऑफ पोस्टमार्टम’ हे दुसरे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
पुणेस्थित विंग्ज पब्लिकेशन्स या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेमार्फत दरवर्षी गोल्डनबुक ॲवार्डसने सन्मानित केले जाते. यावर्षीच्या ५००० पुस्तकांच्या प्रवेशिकांतून ३५ लेखकांच्या साहित्यकृती या पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. यामध्ये सुधा मूर्ती, दलाई लामा, चेतन भगत, प्रियंका चोप्रा, इंद्रा नुयी यांच्यासारख्या आघाडीच्या लेखकांचा समावेश आहे.
पुस्तकांचे परीक्षण मुरलीसुंदरम, कैलाश पिंजानी, डॉ. दीपक प्रभात या विख्यात साहित्यिकांनी केले. ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप असलेला हा पुरस्कार भारतीय लेखक असोसिएशन, टीएलसी कम्युनिटी, सुपरफास्ट ऑथर आणि द ब्रेनफिक्स बिझनेस गुरुकुल यांच्या विद्यमाने कोविड - १९मुळे घरपोहोच देण्यात आला. विंग्ज पब्लिकेशन्सच्या सीईओ आणि या साहित्य पुरस्काराच्या संपादक मनिका सिंग यांनी या पुरस्कारांची २५ जानेवारी रोजी पुण्यात घोषणा केली होती.