पानसरे, कलबुर्गी यांचे मारेकरी मोकाटच; दाभोलकर खून खटल्यातील संशयितांचे पानसरे हत्येत कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:59 AM2024-05-11T11:59:30+5:302024-05-11T12:00:03+5:30
सचिन यादव कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप सुनावली. त्यांच्यासह अन्य ...
सचिन यादव
कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप सुनावली. त्यांच्यासह अन्य २० हून अधिक संशयितांचे ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे, ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या कनेक्शनमध्ये एकच विचाराधारा, समान दुवा आहे. गोळ्या घालून खून केलेल्या आरोपींची गुन्ह्याची साखळी समान असूून तपास यंत्रणेला आणखी काही धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. पानसरे हत्याप्रकरणी दहा जणांच्या वर दोषनिश्चिती झाली आहे.
दाभोलकर खून खटल्यात पुणे येथील विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेसह प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली. संशयित डॉ.वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यातील आरोपींचे पानसरे, कलबुर्गी हत्येचे कनेक्शन असून संशयित अद्याप मोकाट असल्याचे चित्र आहे. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) कडून झाला. पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या प्रकरणात १० संशयितांवर आरोप निश्चित केले. पैकी मुख्य संशयित असलेले विनय पवार आणि सारंग अकोळकर यांना फरारी घोषित केले आहे. या दहा संशयितात समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांचा समावेश आहे. दहापैकी सहा आरोपी बंगळूरमध्ये कैद आहेत, तर चार आरोपी पुण्यामध्ये कैद आहेत. या खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोल्हापुरातील न्यायालयात सुरू आहे.
२०१५ मध्ये पानसरे यांची हत्या
फेब्रुवारी, २०१५ मध्ये पानसरे यांची हत्या झाली. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक पानसरे हत्येतही वापरली गेल्याचा निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालात पुढे आला. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरलेली आणखी एक बंदूक धारवाडमध्ये कलबुर्गी आणि बेंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी २०१७ मध्ये वापरल्याचे तपासात उघड झाले.
तावडेवर संशय
पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून ते गुन्हेगारांना शस्त्र आणि दुचाकी पुरविण्यापर्यंत संशयित आरोपी डॉ.वीरेंद्रसिंह तावडे याचा सहभाग असल्याचे इतर संशयितांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडे डॉ.तावडे याच्या विरोधात भक्कम पुरावे असून त्याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे त्याचा जामीन रद्दच व्हावा, असा युक्तिवाद जिल्हा आणि सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला होता. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.
संशयितांवर आरोप
पानसरे यांच्या खुनाचा कट रचणे, त्यासाठी बेळगावातून शस्त्र उपलब्ध करणे, मारेकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांची कोल्हापूर, बेळगावसह विविध ठिकाणी राहण्याची सोय करणे, गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकीची खरेदीत सहभाग, गुन्ह्यानंतर मारेकऱ्यांना पळून जाण्यात मदत.
चौघांच्या हत्येत समान धागा
दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली असली, तरी अजूनही गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपी सापडलेले नाहीत. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडल्यानंतर पानसरे, लंकेश, कलबुर्गी हत्येत एकच विचारधारा आणि समान दुवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गोळी घालणारे आरोपी अजूनही मोकाट
पानसरे हत्या प्रकरणात आतापर्यंत एसआयटीने १५ साक्षीदार तपासले. एकूण ४२ साक्षीदार तपासले जाणार आहेत. अजून त्यांची तपासणी सुुरूच आहे. पानसरे यांच्यावर गोळी झाडलेले शस्त्र अद्याप सापडलेले नाही. गोळी झाडल्याचा आरोप केलेले दोन मुख्य आरोपी आणि त्यांनी वापरलेली गाडीही पोलिसांच्या हाती सापडलेली नाही.