डॉ. बाबासाहेबांचा फलक लावण्यास विरोध; कोल्हापुरात भाऊसिंगजी रस्त्यावर रस्तारोको
By भारत चव्हाण | Published: April 12, 2023 11:57 PM2023-04-12T23:57:26+5:302023-04-12T23:58:04+5:30
अचान रस्तारोका सुरु झाल्यामुळे या मार्गावरील वाहतुक रात्री अकरा वाजता रोखली गेली.
भारत चव्हाण
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुरुकली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावण्यास अज्ञातांनी विरोध केल्यामुळे संतप्त झालेल्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री अकरा वाजता कोल्हापुरातील भाऊसिंगजी रस्त्यावरील करवीर पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सतप्त कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कुरुकली येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गावातील प्रमुख रस्त्यावर डॉ. आंबेडकर यांचे डिजिटल फलक लावण्यात येत होते. त्यावेळी गावातील अज्ञात व्यक्तींनी असे डिजिटल फलक लावण्यास मज्जाव केला. त्यामुळे कर्यकर्ते संतप्त झाले. ही बातमी कोल्हापूर शहरापर्यंत पोहचली. कुरुकली येथील काही कार्यकर्ते कोल्हापुरात आले. करवीर पोलिस ठाण्यात त्याची माहिती देण्यात आली. तोपर्यंत कोल्हापूर शहराच्या विविध भागातील आंबेडकरवादी कार्यकर्तेही जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करत अचानक पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर ठाण मांडले आणि रस्ता रोको केला.
अचान रस्तारोका सुरु झाल्यामुळे या मार्गावरील वाहतुक रात्री अकरा वाजता रोखली गेली. वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली. तातडीने पोलिसही बंदोबस्तास पोहचले. कार्यकर्ते संतप्त होते. फलक न लावून देण्याच्या प्रयत्नावर निषेध करत होते. आम्ही आंबेडकर जयंती साजरी करायची की नाही असा सवाल विचारत होते. हा समाजावर अन्याय असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविल्या. रात्री उशिरापर्यंत रस्तारोका सुरु होता. शेकडो कार्यकर्ते तेथे दाखल झाले होते.