डॉ. प्रकाश गुणे यांची युद्धहानी कल्याणासाठी १ कोटीची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:19+5:302021-08-14T04:30:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटीवरील प्रसिद्ध निर्मल नर्सिंग होमचे डॉ. प्रकाश गुणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सशस्त्र ...

Dr. Prakash Gune donates Rs 1 crore for war loss welfare | डॉ. प्रकाश गुणे यांची युद्धहानी कल्याणासाठी १ कोटीची देणगी

डॉ. प्रकाश गुणे यांची युद्धहानी कल्याणासाठी १ कोटीची देणगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटीवरील प्रसिद्ध निर्मल नर्सिंग होमचे डॉ. प्रकाश गुणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सशस्त्र सेना युद्धहानी कल्याण निधीसाठी तब्बल एक कोटी रुपयांची देणगी दिली. नवी दिल्ली येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या दालनामध्ये त्यांच्याकडे निधीचा धनादेश डॉ. गुणे यांनी सुपुर्द केला. अशा पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय विश्वातील एखाद्या व्यक्तीने एवढ्या मोठ्या रकमेची देणगी देण्याची ही पहिलीच घटना आहे, याबद्दल गुणे कुटुंबीयांचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अनुराधा गुणे, डॉ. राहुल गुणे, डॉ. आर. एन. गुणे, डॉ. अर्चना शहा उपस्थित होते. समाजमाध्यमांवरही गुणे यांच्या या दातृत्वाचे काैतुक केले जात होते.

मूळचे गडहिंग्लज येथील असलेले डॉ. गुणे गेल्या अनेक वर्षांपासून मूत्रविकारतज्ज्ञ म्हणून कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत. विविध सामाजिक कार्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉ. गुणे यांनी या देणगीने एक नवाच आदर्श निर्माण केला. सशस्त्र दलाचे जे जवान युद्धामध्ये जखमी, जायबंदी होतात त्यांच्या कल्याणासाठी या निधीचा वापर केला जातो.

चौकट

अनुराधा गुणे यांची कल्पना

डॉ. प्रकाश गुणे यांच्या पत्नी अनुराधा यांनी ही कल्पना बोलून दाखविली. त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच देशभक्तीची आम्हांला प्रेरणा मिळाली. देशासाठी आपण काहीतरी समर्पण केले पाहिजे ही भावना होती. आता आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर अशा पद्धतीने राष्ट्रकार्य करण्याची इच्छा मी व्यक्त केली आणि माझ्या कुटुंबीयांनी ती पूर्ण केली.

चौकट

राजनाथसिंह यांच्याकडून ट्विट

हा धनादेश प्रदान करतानाचा फोटो ट्विट करीत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डॉ. गुणे कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. गुणे परिवाराची समाजाप्रती बांधीलकी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे योगदान अभिनंदनीय आहे, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

१३०८२०२१ कोल डॉ. प्रकाश गुणे

कोल्हापूर येथील डॉ. प्रकाश गुणे यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे युद्धहानी कल्याण निधीसाठी १ कोटी रुपयांचा धनादेश संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी डावीकडून डॉ. अर्चना शहा, अनुराधा गुणे, डाॅ. राहुल गुणे, डॉ. आर. एन. गुणे उपस्थित होतेे.

Web Title: Dr. Prakash Gune donates Rs 1 crore for war loss welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.