डॉक्टररुपी देवमाणूस भेटले...श्रेयाचे पाऊल पुढे पडले; गरीब रुग्णावर महिनाभर केले मोफत उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:46 PM2022-06-16T12:46:46+5:302022-06-16T12:47:26+5:30

वडणगे (ता. करवीर) येथील केतन सर्जेराव पोवार याला श्रेयाची परिस्थिती समजल्यावर त्याने एक रुपयाही न घेतला रोज श्रेया व तिच्या आईसाठी डबा आणून दिला.

Dr. Rajendra Abhyankar treated the poor girl Shreya Vishwas Gade for free for a month | डॉक्टररुपी देवमाणूस भेटले...श्रेयाचे पाऊल पुढे पडले; गरीब रुग्णावर महिनाभर केले मोफत उपचार

डॉक्टररुपी देवमाणूस भेटले...श्रेयाचे पाऊल पुढे पडले; गरीब रुग्णावर महिनाभर केले मोफत उपचार

Next

कोल्हापूर : श्रेया विश्वास गाडे (वय १५) ही शिये फाट्यावर मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलगी. दुपारी शाळेतून घरी येताना तिला एका दुचाकीने उडवले. तब्बल पाच महिने ती सीपीआरमध्ये होती. तिथे ती बरी झाली नाही. समाजातील काही चांगल्या लोकांच्या मदतीने तिला टाकाळ्यावरील अस्थिरोग सर्जन डॉ. राजेंद्र अभ्यंकर यांच्या पूर्वा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. महिन्याभराच्या उपचारानंतर श्रेया चालू लागली आणि बुधवारी तिला डिस्जार्च मिळाला. तिच्यावरील उपचाराचे तब्बल १ लाख ५२ हजार रुपये बिल झाले, परंतु डॉ. अभ्यंकर यांनी त्यातील एक पैसाही घेतला नाही. त्यांच्यासारख्या देवमाणसामुळेच श्रेयाचे पाऊल पुढे पडले.

श्रेयाही टोप येथील वत्सला बापूसो पाटील माध्यमिक विद्यालयात नववीत शिकते. शाळेतून घरी येताना ४ डिसेंबरला तिला दुचाकी क्रमांक (एमएच ०९, एलटी ८३६)च्या स्वाराने उडवले. त्यात तिच्या डाव्या मांडीचे हाड मोडले. तशाच अवस्थेत तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर तिथे तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तब्बल पाच महिने ती उपचार घेत होती. परंतु, तिचा पाय बरा झाला नाही. उलट जखमेतील संसर्ग वाढला. अशीच स्थिती राहिली तर पाय काढून टाकावा लागला असता, ही बाब सांगली येथील संग्राम संस्थेच्या प्रमुख मीना शेषू यांना कुठून तरी समजली. त्यांनी मुलीचा पाय वाचवला पाहिजे, असा निर्धार केला व तिला १६ मे रोजी डॉ. अभ्यंकर यांच्या रुग्णालयात दाखल केले.

त्यांनी स्वतंत्र रुम देऊन श्रेयाची व्यवस्था केली. तिच्या पायावर शस्त्रक्रिया केली व मायेच्या ममतेने उपचार केल्यामुळे तिची जखम बरी झाली. ती वॉकर घेऊन आता पाय टाकू लागली आहे. मीना शेषू यांनी डॉ. अभ्यंकर यांची भेट घेतली व उपचाराचा खर्च आपण करण्यास तयार असल्याचे सांगितले. ते ऐकून डॉ. अभ्यंकर यांनी हातच जोडले. माझ्या ज्ञानाचा, सेवेचा उपयोग अशा एखाद्या रुग्णासाठी करण्याची आपण मला संधी दिली, असे मी मानतो म्हणत त्यांनी एक पैसाही घेतला नाही. डॉ. अभ्यंकर हे अस्थिरोगतज्ज्ञांच्या महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष असून, आजपर्यंत पडद्याआड राहून त्यांनी अनेक रुग्णांना अशी मदत केली आहे. मदत केलेली या हाताची त्या हाताला कळता कामा नये, अशी त्यांची भावना आहे.

केतनला सलामच...

श्रेयाचे कुटुंबीय शियेमध्ये राहत असल्याने दवाखान्यात जेवणाची अडचण आली. शोध घेतल्यावर वडणगे (ता. करवीर) येथील केतन सर्जेराव पोवार हा मुलगा डबे पोहोच करत असल्याचे समजले. त्याला श्रेयाची परिस्थिती समजल्यावर त्याने एक रुपयाही घेतला नाही. तो रोज श्रेया व तिच्या आईसाठी डबा आणून देत असे. श्रेयाची हाडाची शस्त्रक्रिया झाली असल्याने ती लवकर बरी व्हावी, यासाठी तो रोज उकडलेले अंडे, चिकन सूप द्यायचा. तब्बल २९ दिवस त्याने हे काम माणुसकीच्या भावनेने केले. त्याच्या या मदतीची किंमत करणे शक्य नाही.

'लोकमत'कडून पाठपुरावा

श्रेयाचे कौटुंबिकस्थिती खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासारखी नव्हती. म्हणून लोकमतने तिच्यावर आधी सरकारी रुग्णालयात चांगले उपचार कसे होतील यासाठी प्रयत्न केले. ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक विश्वास पाटील, बातमीदार भीमगोंड देसाई यांनी श्रेयाच्या सरकारी व खासगी उपचाराचा तीन महिने पाठपुरावा केला.

Web Title: Dr. Rajendra Abhyankar treated the poor girl Shreya Vishwas Gade for free for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.