रणजितसिंह डिसले यांना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 PM2021-01-13T17:06:02+5:302021-01-13T17:09:08+5:30
Teacher Award Kolhpaur- ग्लोबल टिचर ॲवॉर्ड पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोल्हापूर : ग्लोबल टिचर ॲवॉर्ड पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापुरातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात रविवारी (दि.१७) सकाळी दहा वाजता शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
बापूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबविले. काही उपक्रमांचे संकल्प केले होते. त्यामध्ये या पुरस्काराचा समावेश होता. त्यानुसार बापूजींच्या नावाने पहिला पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिनी रविवारी प्रदान केला जाणार असल्याचे प्राचार्या गावडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात प्रा. अशोक पाटील, संजय सुतार, प्रदीप पाटील संपादित समर्पित गुरूदेव : प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. महेश शिंदे, शंकर शिंदे संपादित पुत्र अमृताचा व गंध चंदनाचा या ग्रंथांसह शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे दिनदर्शिका प्रकाशित केली जाणार असल्याचे सहसचिव डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी सांगितले. यावेळी सहसचिव डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार उपस्थित होते.
बापूजींच्या जन्मशताब्दीपासून विवेकानंद सप्ताहातील दि. १७ जानेवारी हा दिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा केला जाणार असल्याचे प्राचार्या गावडे यांनी सांगितले.