प्रारूप मतदार यादीतही घोळ

By admin | Published: September 20, 2015 01:51 AM2015-09-20T01:51:43+5:302015-09-20T01:51:43+5:30

महापालिका निवडणूक : प्रशासनाच्या कारभारावर इच्छुकांची नाराजी

The draft is also on the voters list | प्रारूप मतदार यादीतही घोळ

प्रारूप मतदार यादीतही घोळ

Next

कोल्हापूर : प्रभाग रचना करताना आणि आरक्षण टाकताना झालेल्या गंभीर स्वरूपाच्या चुकांमधून महानगरपालिका प्रशासनाने अद्याप शहाणपण शिकलेले दिसत नाही. शनिवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करणार म्हणून जाहीर केले; परंतु शनिवारी दुपारपर्यंत या याद्या विभागीय कार्यालयाकडे पोहोचल्याच नाहीत. ज्या काही याद्या पोहोचल्या त्याची झेरॉक्स काढून देण्याच्या पद्धतीमुळे अत्यंत खराब मिळाल्या आहेत. महापालिकेच्या कारभारावर इच्छुक व त्यांच्या समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार शनिवारपासून शहरातील ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या. याद्यांबाबत कमालीची उत्सुकता असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून महानगरपालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडे इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी चौकशी करायला सुरुवात केली. इच्छुक विभागीय कार्यालयात जाताच त्यांना निवडणूक विभागाकडून अद्याप याद्या उपलब्ध झालेल्या नाहीत. दुपारनंतर या, असे सांगण्यात येत होते. त्यामुळे दुपारी चारनंतर पुन्हा चौकशी व्हायला लागली. त्यावेळी काही ठिकाणी झेरॉक्स काढायला पाहिजेत, असे सांगून सीएफसी सेंटरमध्ये पैसे भरून या, असे सांगण्यात येऊ लागले. काहींनी सीएफसी सेंटरमध्ये प्रत्येक पानाला दोन रुपये याप्रमाणे पैसे भरलेही, परंतु नंतर त्यांना झेरॉक्सही तुम्हीच काढून घ्या, असे सांगितले गेले.
गांधी मैदान आणि शिवाजी मार्के ट विभागीय कार्यालयात तर सायंकाळी पाचनंतर याद्या मिळाल्या. त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. सर्व प्रभागाच्या किमान १० प्रतीत प्रारूप मतदार याद्या उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. उलट उमेदवारांनाच झेरॉक्स मारून घ्या, असे सांगण्यात येत होते. प्रारूप याद्यांचा हा घोळ दिवसभर सुरू राहिला. त्यामुळे इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. प्रारूप मतदार याद्या या प्रत्येक पानांची झेराक्स काढून देण्यात येत आहेत. त्यामुळे मतदारांचे चेहरे ओळखत नाहीत. काही पानांची नावे पुसट आली आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
ज्यांना मतदार याद्या मिळाल्या त्यांनी याद्या फोडण्यात घोळ झाला असल्याचे सांगितले. पहिल्याच दिवशी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The draft is also on the voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.