कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्रारूप रचना जाहीर; मतदार संघांची मोडतोड, अदलाबदल अन् फाटाफूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:04 PM2022-06-03T13:04:04+5:302022-06-03T13:08:46+5:30

जिल्हा परिषदेचे ९, तर पंचायत समितीच्या १८ मतदार संघांची वाढ झाली.

Draft structure of Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti constituencies announced | कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्रारूप रचना जाहीर; मतदार संघांची मोडतोड, अदलाबदल अन् फाटाफूट

कोल्हापूर जिल्हा परिषदेची प्रारूप रचना जाहीर; मतदार संघांची मोडतोड, अदलाबदल अन् फाटाफूट

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील याआधीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदार संघांची प्रारूप रचना गुरुवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केली आहे. जुन्या मतदार संघांमध्ये प्रचंड प्रमाणात मोडतोड झाली आहे. अर्धे गाव एका, तर उरलेले गाव दुसऱ्या पंचायत समिती मतदार संघात, असाही प्रकार झाला असून यामुळे अनेक उमेदवारांची दाणादाण उडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे ९, तर पंचायत समितीच्या १८ मतदार संघांची वाढ झाली.

जिल्ह्यातील ९ जिल्हा परिषद मतदारसंघ वाढणार हे आधीच निश्चित झाले होते. परंतु गुरुवारी प्रारूप आराखड्याची अधिसूचना जाहीर केल्यानंतर या मतदार संघांचे काहीसे चित्र स्पष्ट झाले आहे. या बदललेल्या रचनेचा कोणाला कुठे झटका बसणार आणि कोणाला ही रचना दिलासादायक ठरणार आहे, याचीच चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

चार तालुक्यांतील मतदारसंघ कायम...

गडहिंग्लज, आजरा, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांतील मतदार संघांच्या संख्येत काहीही बदल झालेला नाही. मात्र आजरा आणि चंदगड येथे नव्याने नगरपंचायती स्थापन झाल्यामुळे ही दोन्ही शहरे ग्रामीण लोकसंख्येतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या तालुक्यातील आधीच्या मतदार संघांची रचना पूर्ण बदलून गेली आहे. यातील आजरा, भुदरगड आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची ताकद असल्याने यांच्यातच कडवी लढत होणार आहे. गगनबावडा तालुक्यात शिवसेना विरुध्द काँग्रेस असे स्वरूप राहील.

शाहूवाडीत सावे, पन्हाळ्यात पुनाळ नवा मतदारसंघ

शाहूवाडीमध्ये सावे हा नवा मतदारसंघ वाढला आहे, तर पन्हाळ्यामध्येही पुनाळ हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. हे दोन्ही मतदारसंघ मिळवण्यासाठी जनसुराज्य आणि शिवसेनेमध्ये पुन्हा संघर्ष उफाळणार आहे.

हातकणंगलेत एक नवीन मतदारसंघ

हातकणंगले येथे हातकणंगले आणि हुपरी येथे अनुक्रमे नगरपंचायत आणि नगरपरिषद स्थापन झाल्यामुळे या मतदार संघातील गावे विभागून रूई, टोप आणि हेर्ले हे मतदारसंघ तयार करण्यात आले आहेत. हातकणंगलेमध्ये नवा एक मतदारसंघ वाढला आहे. या तालुक्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुध्द भाजप, जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी लढत होऊ शकते.

शिरोळला यड्राव वाढला

शिरोळमध्ये नगरपालिका स्थापन करण्यात आल्याने या ठिकाणी यड्राव हा नवा मतदारसंघ वाढला असून यातील गावे आकिवाट आणि यड्राव मतदारसंघात विभागली आहेत. या तालुक्यात शिवसेना विरुध्द भाजप, स्वाभिमानी असा संघर्ष होऊ शकतो.

करवीरमध्ये शिरोली दुमाला व गोकुळ शिरगाव

करवीरमध्ये शिंगणापूर आणि सांगरूळची मतदारसंख्या फोडून नवा शिरोली दुमाला आणि उजळाईवाडीचे दोन भाग करून गोकुळ शिरगाव हे दोन नवे मतदारसंघ अस्तित्वात आले आहेत. महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात एकत्र असले तरी, या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस असा सामना रंगणार आहे.

नरतवडे, बानगे नवे मतदारसंघ

राधानगरी तालुक्यात नरतवडे या नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची वाढ झाली आहे. कागलमध्ये बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. येथे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचा सामना रंगेल.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये हरकती घेण्यासाठी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून नोडल ऑफिसर उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर आणि तहसीलदार अर्चना कापसे यांनी हरकती घेण्याबाबतच्या प्रक्रियेची माहिती प्रतिनिधींना दिली.


एक गाव दोन गटात विभागले

उचगाव पश्चिम आणि पूर्व असे दोन पंचायत समिती मतदारसंघ निर्माण करण्यात आले असून यामध्ये उचगाव गाव दोन मतदार संघात विभागले आहे, तर गांधीनगर गावाचे दोन भाग करण्यात आले असून एक भाग उचगाव जिल्हा परिषद मतदार संघात आणि दुसरा भाग मुडशिंगी जिल्हा परिषद मतदार संघात समाविष्ट करण्यात आला आहे. या नव्या रचनेमुळे अनेक ठिकाणी प्रचारावेळीही उमेदवारांची कोंडी होणार आहे. गांधीनगरमध्ये निम्म्या गावात एका आणि निम्म्या गावात दुसऱ्या मतदार संघातील उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.

शहरातील नेते ग्रामीण भागात

नगरपंचायत आणि नगरपरिषदा स्थापन झालेल्या शहरांमधील नेत्यांनी जिल्हा परिषदेवर पुन्हा येण्यासाठी आपली नावे ग्रामीण भागात नोंदवून घेतली असून आता त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

तालुकावार जिल्हा परिषद मतदारसंघ...

  • शाहूवाडी ५
  • पन्हाळा ७
  • हातकणंगले १२
  • शिरोळ ८
  • करवीर १३
  • गगनबावडा २
  • राधानगरी ६
  • कागल ६
  • भुदरगड ४
  • आजरा ३
  • गडहिंग्लज ५
  • चंदगड ५
  • एकूण ७६

Web Title: Draft structure of Kolhapur Zilla Parishad and Panchayat Samiti constituencies announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.