खानविलकर पंप येथील ड्रेनेजलाईनचे काम अखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 04:04 PM2019-12-03T16:04:07+5:302019-12-03T16:06:50+5:30
कोल्हापूर शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला. सायंकाळनंतर पुन्हा येथून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू झाली.
कोल्हापूर : शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा या मार्गावर ड्रेनेजलाईनच्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद होता, रविवारपासून अंशत: रस्ता खुला झाला. महापालिकेच्या वतीने सोमवारी येथील मुरुम टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी दिवसभर रस्ता बंद ठेवण्यात आला. सायंकाळनंतर पुन्हा येथून दुचाकी वाहनांची ये-जा सुरू झाली.
महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या वतीने १२ जून रोजी खानविलकर पेट्रोल पंप ध्रुव रेसिडेन्सीसमोर (राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळ) येथे ड्रेनेजलाईनसाठी खुदाई केली होती. ड्रेनेजलाईन आणि क्रॉस ड्रोनचे काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाची तपासणीही करण्यात आली आहे. ४0 लाखांच्या निधीतून हे काम केले आहे.
रस्त्यावर खड्डे आणि मुरुम असतानाही रविवारी दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा सुरू होती. रात्री उशिरा येथे उसाने भरलेला टॅÑक्टर खड्ड्यात अडकला. अखेर रात्री उशिरा जेसीबीने ट्रॅक्टर काढण्यात आला. येथील काम जरी पूर्ण झाले असले, तरी दोन चेंबरच्या स्लॅबच्या ठिकाणी आणखीन पाच दिवस तरी बॅरेकेट लावून ठेवावे लागणार आहेत. सध्या दुचाकींसाठी वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांना आणखीन काही दिवस वाहतूक बंद राहणार आहे.
डांबरी रस्त्यासाठी करावी लागणार प्रतीक्षा
ड्रेनेजलाईनसाठी २0 ते २५ फूट खुदाई करण्यात आली होती; त्यामुळे येथे मुरुम टाकून रस्ता करावा लागणार आहे. रस्ता खचू नये; यासाठी मुरुमचे तीन थर द्यावे लागणार आहेत. तसेच डांबरी रस्ता करण्यासाठी टाकलेला मुरमाचा बेस तयार होणे आवश्यक आहे; यासाठी महिनाभरानंतरच डांबरी रस्ता करणे योग्य ठरणार आहे. जर अगोदरच रस्ता केला, तर रस्ता खचण्याचा धोका आहे. दरम्यान, रस्त्यासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.