ड्रेनेज पाईपला धडकून दुचाकीवरील सख्खे भाऊ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 07:26 PM2017-09-17T19:26:07+5:302017-09-17T19:28:01+5:30
कोल्हापूर : सीपीआर ते कसबा बावडा रोडवर खानविलकर पेट्रोल पंपाशेजारील चिपडे सराफ दुकासमोर रस्त्यावर टाकलेल्या ड्रेनेज पाईपला भरधाव दुचाकी धडकून रविवारी सायंकाळी सख्खे भाऊ जागीच ठार झाले.
योगेश महादेव घाटगे (३२, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) आणि तेजस (२८) अशी त्यांची नावे आहेत. दुचाकी इतकी भरधाव होती की सातफुट पाईपमधून ती आरपार गेली. अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली.
योगेश घाटगे हा गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याचा भाऊ तेजस सेंट्रींगची कामे करीत होता. रविवारी सकाळी दोघेही चहा-नाष्टा करुन काम बघून येतो म्हणून दुचाकीवरुन बाहेर पडले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोघे घरी जाण्यासाठी कसबा बावड्याहून सीपीआरकडे भरधाव येत होती.
खानविलकर पेट्रोलपंपाशेजारील चिपडे सराफ दुकानासमोर येताच रस्त्याकडेला असलेल्या ड्रेनेजच्या सिमेंट पाईपला दुचाकी घडकली. त्यामध्ये दोघांच्याही छातीला, तोंडाला मार लागला. त्यात दोघे जागीच ठार झाले. त्यांची दुचाकी इतकी भरधाव होती, की ती सात फुट पाईपमध्ये आरपार घुसली. मोठा आवाज झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणारे वाहनधारक मदतीसाठी धावले. दोघांचेही मृतदेह सिमेंटच्या दोन्ही पाईपमध्ये अडकून पडले होते.
अपघाताचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. स्थानिक नागरिकांनी या अपघाताची वर्दी शाहूपुरी पोलीसांना दिली. काही क्षणातच पोलीस घटनास्थळी आले. योगेश घाटगे हा जिवंत असल्याचे समजून त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळावरील पंचनामा करताना दोघे सख्खे भाऊ असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांच्या खिशामध्ये मिळालेल्या मोबाईलवरुन नातेवाईकांशी संपर्क साधून बोलवून घेतले. अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांनी ही वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त दुचाकी बाहेर काढून ती शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे नेली.
महापालिकेचा निष्काळजीपणा
गेल्या दोन महिन्यापासून याठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील ड्रेनेजचे काम सुरु आहे. रस्त्यापलिकडे दहा फुट खोल ड्रेनेज लाईन उघडी आहे. निधी अभावी हे काम रखडले आहे. या खड्डयात पडून अपघात होवू नये, यासाठी संबधीत ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला ड्रेनेज पाईप लाईनचे सिमेंटचे नळे ठेवले आहेत. त्यामुळे
याठिकाणी कसबा बावड्याकडून दसरा चौक, सीपीआरकडे जाणाºया वाहनांना अडथळा येत होता. जीव मुठीत घेवूनच येथून जावे लागत होते. चार दिवसापूर्वी याठिकाणी अपघात होवून दोघेजण जखमी झाले होते. त्यापोठापाठ हा मोठा अपघात झाल्याने महापालिका प्रशासन व ठेकेदाराच्या निष्काळजीपणा या दुर्घटनेला जबाबदार असल्याच्या संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण
सीपीआर चौक ते कसबा बावडा रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सुरु असताना खानविलकर चौकात आयआरबी कंपनीने याठिकाणी खुदाई करुन ठेवली होती. त्यामध्ये दूचाकीसह पडून दोघा भावांचा मृत्यू झाला होता. या वर्षापूर्वीच्या अपघाताची आठवण या दूर्घटनेवरुन नागरिकांना झाली.