शिरोळ, जयसिंगपूरमध्ये ६३ घरांचे स्वप्न पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:51 AM2020-12-11T04:51:00+5:302020-12-11T04:51:00+5:30
संदीप बावचे : जयसिंगपूरमध्ये २३ तर शिरोळमध्ये ४० जणांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून केंद्र व ...
संदीप बावचे : जयसिंगपूरमध्ये २३ तर शिरोळमध्ये ४० जणांचे घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून केंद्र व राज्य सरकारच्या मदतीतून बेघरांना घरकुले बांधण्यासाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले आहे. केंद्राकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील निधीची प्रतीक्षादेखील लाभार्थ्यांना लागून राहिली आहे.
‘सर्वांना घरे’ या संकल्पनेतून बेघरांना घरकुलाची योजना केंद्र सरकारकडून सुरू आहे. शहरी भागासाठी केंद्र व राज्य शासनाचा असा मिळून अडीच लाखांचा निधी घरकुलासाठी दिला जातो. शासनाच्या नियमांनुसार पालिका प्रशासनाने जनजागृती करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जयसिंगपूर शहरात पहिल्या टप्प्यात १२१ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. केंद्र व राज्याचा निधी मिळाल्यामुळे ७१ घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. त्यातील २३ घरे पूर्णत्वास आली आहेत तर शिरोळमध्ये पहिल्या टप्प्यात १७८ घरांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यातील ४० घरांची बांधकामे पूर्णत्वास आली आहेत. केंद्र सरकारकडून दुसरा व तिसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नगरपालिकेकडून केंद्राच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे.
-----------------
चौकट - केंद्राचा निधी प्रलंबित
‘सर्वांसाठी घरे’ या योजनेतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरोळमधील १७८ जणांचा प्रस्ताव दीड वर्षांपूर्वी केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यातील निधी मिळाल्यानंतर घरकुले बांधकामांना वेग आला होता. मात्र, कोरोनाच्या काळात तांत्रिक अडचणींनंतर बांधकामे ठप्प झाली होती. जुलै २०२० मध्ये शिरोळ नगरपालिकेसाठी १ कोटी ६ लाख ८० हजार रुपयांचा निधी राज्य शासनाने दिल्यामुळे बांधकामे पुन्हा सुरू झाली. मात्र केंद्राचा निधी अजूनही प्रलंबित आहे.