सैनिक होण्याचे स्वप्न अपघाताने उद्ध्वस्त; सांगलीचा तरुण मृत्युशय्येवर
By admin | Published: February 16, 2015 11:29 PM2015-02-16T23:29:28+5:302015-02-16T23:31:01+5:30
ही दुर्दैवी कहाणी आहे, सांगली जिल्ह्यातील कंथे गावच्या अप्पासाहेब इरमल याची! वडील शेतमजूर, हातावरचे पोट... सैनिक झाल्यानंतर अठराविश्व दारिद्र्य दूर होईल व देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल
आनंद त्रिपाठी - वाटूळ (जि. रत्नागिरी)
बालवयापासूनच सैनिक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हलाखीच्या परिस्थितीमध्ये रात्रंदिवस मैदानावर कसून सराव करणारा अप्पासाहेब इरकर हा (वय २०) तरुण १२ वी पास होताच सैनिक होण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाला. शुक्रवारी (दि. १३) शिवाजी स्टेडियममध्ये तो जीव तोडून धावला. मैदानावरील सर्व चाचण्या त्याने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. बाकी होती ती १६ फेब्रुवारीची वैद्यकीय चाचणी; पण दुर्दैवाने १५ तारखेला रात्री रत्नागिरीमध्येच त्याला अज्ञात वाहनाने ठोकरले आणि हा गरीब तरुण आज मृत्युशय्येवर आहे. ही दुर्दैवी कहाणी आहे, मूळच्या सांगली जिल्ह्यातील कंथे गावच्या अप्पासाहेब इरमल याची! वडील शेतमजूर, हातावरचे पोट... आपण सैनिक झाल्यानंतर घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर होईल व आपलेही देशसेवेचे स्वप्न पूर्ण होईल, या आशेने तो रत्नागिरीत भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी आला. मैदानावरील सगळ्या चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाला. त्यानुसार १६ फेब्रुवारीला होणाऱ्या वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे पत्रही त्याच्या हातात मिळाले होते.