कर्मवीरांचे ज्ञानदानाचे स्वप्न एन. डी. पाटील यांच्या प्रत्यक्ष कृतीतून - : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 02:12 PM2019-11-25T14:12:49+5:302019-11-25T14:14:27+5:30
मला रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये रयत शिक्षण संस्थेला आणि एक लाख रुपये इचलकरंजी येथे वाचनालय इमारतीसाठी प्रदान करतो.
कऱ्हाड : ' कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष आज सर्वत्र पसरला आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला ज्ञानदान देण्याचे स्वप्न पाहिले. तर प्रा. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली. कर्मवीरांनी ज्ञानदानाचे पाहिलेले स्वप्न एन. डी. पाटील यांनी त्यांच्यानंतर प्रत्यक्ष कृतीतून आणण्याचे काम केले,' असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
विद्यानगर, ता. कऱ्हाड येथील सद्गुरू गाढगे महाराज महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्यावतीने 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०१९' राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजीकेंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते डॉ. एन. डी. पाटील व सरोजताई पाटील यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास डॉ. अनिल काकोडकर, खासदार श्रीनिवास पाटील, राम खांडेकर, अरुण गुजराथी, जेष्ठ लेखक जबार पटेल, आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने आदींची उपस्थिती होती. दरम्यान, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राम खांडेकर लिखित 'सत्तेच्या पडछायेत' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे उत्तम वाचक होते. जीवनात विविध क्षेत्रात योगदान देण्याचं कर्तृत्व त्यांनी केलं. राम खांडेकर यांचे भाग्य आहे की त्यांना यशवंतराव चव्हाण व पी. व्ही. नरसिहराव यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एन. डी. पाटील यांनी वयाच्या १६ व्या वर्षी १९४५ मध्ये ग्रामीण भागात प्रश्न, धरणग्रस्तांचे आंदोलन,जागतिकीकरणा विरोधातील आंदोलने अशा अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. गावामुक्ती संग्राम, कापूस एकाधिकार खरेदी योजनेची अंमलबजावणी, सीमा आग्रही प्रतिपादनामुळे महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्याचे ठरविले. अशा अनेक आंदोलनात त्यांनी सामान्य जनतेचे नेतृत्व केले.
यावेळी एन. डी. पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्यावतीने अनेक वर्षांपासून प्रतिष्ठान काम करतेय. ज्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. ते यशवंतराव हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होय. या जिल्ह्यात सुरवातीला त्यांचे कर्तृत्व ब हरले. त्यानंतर त्यांनी देशाचा कारभार पाहिला. ते जसे कृष्णाकाठी जन्मले त्याप्रमाणे मी वारणाकाठी जन्मलो. मला रयत शिक्षण संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये रयत शिक्षण संस्थेला आणि एक लाख रुपये इचलकरंजी येथे वाचनालय इमारतीसाठी प्रदान करतो.
यावेळी प्रास्ताविक अरुण गुजराथी यांनी केले. आभार शरद चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.