स्वप्नांचा खेळ... अन् आमिषाचा बळी !

By Admin | Published: March 12, 2016 12:49 AM2016-03-12T00:49:33+5:302016-03-12T00:57:06+5:30

की असाच कोणी मोठा व्यावसायिक त्याच्या मोठ्या स्वप्नासाठी कुठल्याही सर्वसामान्यांचा सहज बळी देऊ शकतो...? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.

Dream game ... and the victim of the lurch! | स्वप्नांचा खेळ... अन् आमिषाचा बळी !

स्वप्नांचा खेळ... अन् आमिषाचा बळी !

googlenewsNext

गडहिंग्लज : एक व्यावसायिक... त्याचा मोठेपणाचा हव्यास... त्यासाठी त्याच्या मोठ्या उलाढाली... त्यातून त्याचं कर्जाच्या गाळात रुतन... अशी अनेक उदाहरणे समाज बघतो, पण असं गाळात रुतलेल्या एका व्यावसायिकाने त्यातून वर येण्यासाठी एका सर्वसामान्य मोलमजुराचा थंड डोक्याने ‘बळी’ देणं अन् त्याच्या कुटुंबीयांना दु:खाच्या खाईत होरपळायला लावून त्यावर स्वत:च्या कुटुंबासाठी सुखाची ऊब शोधणाऱ्या घटनेने नुकताच जिल्हा हादरला.
कर्जाच्या गाळातून वर येण्यासाठी कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक अमोल पवारने ३५ कोटींचा विमा हडप करण्याच्या रचलेल्या खेळात कर्नाटकातून गडहिंग्लजमध्ये मोलमजुरीसाठी आलेल्या एकोणीस वर्षीय रमेश नाईक या तरुणाचा केवळ सतराशे रुपयाच्या आमिषाने बळी गेला. विजापूर जिल्ह्यातील मुदेब्याळ तालुक्यातील नागबेनाळ येथील कृष्णापा नाईक हे त्यांच्या पत्नी शांताबाई, मुलगा रमेश आणि मुलगी संगीता यांच्यासह मोलमजुरीसाठी डिसेंबरमध्ये गडहिंग्लज येथे आले. कडगाव रस्त्यावरील माळावर पत्र्याच्या शेडमध्ये राहून एका ठेकेदाराकडे रस्त्याच्या कामासाठी मोलमजुरी करू लागले. २८ फेब्रुवारीलाही ते नेहमीप्रमाणेच रस्त्याचे काम संपवून परतत असताना आपल्या खेळासाठी सावज शोधणाऱ्या अमोलची नजर रमेशवर पडली. नळ कनेक्शनसाठी खड्डा काढायचे आहे असे सांगून त्याला एक दिवसाच्या कामाचे सतराशे रुपये देण्याचे आमिष दाखविले. रोजंदारीवर राबणाऱ्या रमेशसाठी ही रक्कम खूप मोठी वाटल्याने त्यात तो भुलला.
अमोलने त्याचा भाऊ विनायकसह रचलेल्या या खेळाची रमेशच्या कुटुंबीयांना साधी शंकाही येण्याची सुतराम शक्यता नव्हतीच, पण रमेशच्या सहज बळी जाण्यास आणखीन एक कारण म्हणजे त्याचे त्या दोघांसोबतचे दारू पिणे... दारूच्या नशेत असलेल्या रमेशचा गळा आवळून खून करणे दोघा भावांना सहज शक्य झाले, अन्यथा रमेशचा सक्षम प्रतिकार कदाचित त्यांचा खेळ उधळू शकला असता.
दोघा भावांनी त्यांचा रचलेला ‘खेळ’ पूर्ण केला. मात्र, पोलिसांनी कसून या खेळाची पाळेमुळे खोदून दोघांच्या मुसक्या आवळल्या. आता कायद्याने त्यांना शिक्षा होईलही. मात्र, केवळ सतराशे रुपयाच्या आमिषासाठी बळी गेलेल्या रमेशचे काय? तो ज्या कुटुंबाचा आधार होता त्या कुटुंबाचे काय? त्या कुटुंबाच्या स्वप्नांचे काय? की असाच कोणी मोठा व्यावसायिक त्याच्या मोठ्या स्वप्नासाठी कुठल्याही सर्वसामान्यांचा सहज बळी देऊ शकतो...? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.

Web Title: Dream game ... and the victim of the lurch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.