कोल्हापूरला कृषी विद्यापीठाचे स्वप्न अजून प्रस्तावातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:49+5:302020-12-11T04:49:49+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठ आहे. १९६८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, ...
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे कृषी विद्यापीठ आहे. १९६८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या दहा जिल्ह्यांचे आहे. विद्यापीठातंर्गत कृषी महाविद्यालये कार्यरत आहेत. कोल्हापुरातही कृषी महाविद्यालय आहे तथापि राहुरीची कोणत्याही प्रकारची भौगोलिक संलग्नता नसल्यानेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी मिळून कोल्हापुरात स्वतंत्र कृषी विद्यापीठ तयार करावे, अशी मागणी पुढे आली.
राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी तर विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी हा प्रश्न उपस्थित करत कोल्हापुरात कृषी विद्यापीठ स्थापन व्हावे असा आग्रह धरला होता. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे हे कृषीच्या आढावा बैठकीसाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळीदेखील आबीटकर व खासदार मंडलिक यांनी हा विषय लावून धरला.
चौकट ०१
कोल्हापूरसाठी आग्रह का
राहुरी हे खानदेशात येते, तेथील भौगाेलिक परिस्थिती, शेतीच्या गरजा वेगळ्या आहेत. या तुलनेत कोल्हापूरच्या वेगळ्या आहेत .कोल्हापूर, सांगली, सातारा व साेलापूरमध्ये समृद्ध शेती आहे. शेतीचे नवनवीन प्रयोग केले जातात. पिकांमध्ये विविधता आहे. शेती संशोधनासाठी खूप वाव आहे. विद्यापीठ झाले तर या शेतीतील प्रयोगांना संशोधनाचे बळ मिळणार आहे.
चौकट ०२
उपविभागाचाही प्रस्ताव
कृषीमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानुसार प्रस्ताव झाला. यावर मंत्रालयात व राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी चर्चा झाली. चर्चेत कृषी विद्यापीठासाठी पायाभूत सुविधा जास्त लागतात, हे खूप खर्चिक असल्याने उपविभाग स्थापन करू, असा प्रस्ताव पुढे आला, पण आबीटकर यांनी तो फेटाळून लावला.
प्रतिक्रीया
मुळातच कोल्हापूर हे राहुरी विद्यापीठाशी जोडणे ही मोठी चूक होती. आता ती सुधारावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. लवकरच यावर मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांसमवेत चर्चेला जाणार आहे.
आमदार प्रकाश आबीटकर