पन्हाळ्याचा रस्ता खचण्यासोबत आता दरडही कोसळू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 07:07 PM2019-08-05T19:07:58+5:302019-08-05T19:16:21+5:30

बुधवार पेठ येथे रस्त्याला भेग पडल्याने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाण्यायेण्याचा रस्ता बंद झाला आहे. यात भर म्हणून की काय, आता या मार्गावरील तटबंदीचे मोठे दगडही रस्त्यावर कोसळू लागले असून, दरड कोसळण्याची भीती आहे; यामुळे पन्हाळकरांची पुरती कोंडी झाली आहे. सर्व नागरिकांना गडावरच बंदिस्त राहावे लागले आहे. इतिहासात प्रथमच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली असून, पर्यायी रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे.

With the dredging of the Panhala road, now the cracks started to collapse | पन्हाळ्याचा रस्ता खचण्यासोबत आता दरडही कोसळू लागली

 पन्हाळगड-बुधवार पेठ रस्ता खचल्यामुळे बंद आहे. आता या मार्गांवर मोठमोठे दगडही कोसळू लागल्याने भविष्यात हा एकमेव रस्ताही कायमचा बंद होण्याची भीती आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देपन्हाळ्याचा रस्ता खचण्यासोबत आता दरडही कोसळू लागलीनागरिकांची कोंडी, इतिहासात प्रथमच रस्ता बंद, पर्यायी रस्त्याची मागणी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : बुधवार पेठ येथे रस्त्याला भेग पडल्याने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाण्यायेण्याचा रस्ता बंद झाला आहे. यात भर म्हणून की काय, आता या मार्गावरील तटबंदीचे मोठे दगडही रस्त्यावर कोसळू लागले असून, दरड कोसळण्याची भीती आहे; यामुळे पन्हाळकरांची पुरती कोंडी झाली आहे. सर्व नागरिकांना गडावरच बंदिस्त राहावे लागले आहे. इतिहासात प्रथमच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली असून, पर्यायी रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ऐतिहासिक पन्हाळगडावर जाण्यासाठी ब्रिटिशकाळात डांबरी रस्ता करण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर ही रस्तादुरुस्तीची आणि देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आली. या विभागाने आतापर्यंत रस्तादुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम केले आहे. काँक्रीट टाकून आणि रेलिंग बांधून तटाची विरुद्ध बाजू मात्र भक्कम केली असली तरी मूळ रस्ता जुनाच आहे; परंतु आता रस्त्याचा विषय गंभीर बनला आहे.


पन्हाळ्याचे तहसीलदार शेंडगे यांनी आपत्ती व्यवस्थापनाला याबाबत सूचना केली आहे. आमदार सत्यजीत पाटील यांनी खचलेल्या रस्ता व दरडी कोसळण्याची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे तसेच इतर प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थीत होते. रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करावे व पन्हाळा नागरीकांची गैरसोय तत्काळ दूर करावी अशा सुचना सर्व अधिकार्याना आमदारांनी दिलेल्या आहेत. यावेळी बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, असिफ मोकाशी, गोपाळ साठे, पराग स्वामी, रोहित बांदीवडेकर, अमरसिंह भोसले, शिवसेना शहर अध्यक्ष मारुती माने उपस्थीत होते.

याशिवाय तहसीलदारांसह माजी मंत्री विनय कोरे, पन्हाळ्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती अनिल कंदूरकर, पन्हाळ्याच्या नगराध्यक्ष रूपाली धडेल, रवींद्र धडेल, आदींनी परिस्थितीची पाहणी केली आहे. या संदर्भात पन्हाळ्यावरील लॉज तसेच हॉटेलचालकांना येणाऱ्या पर्यटकांना आणि मुक्कामी आलेल्या पर्यटकांसाठी सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही येथे भेट देणार आहेत.

बुधवार पेठ, गुरुवार पेठ, घुंगुरवाडीतही रस्ता खचला

पन्हाळगडावरील तसेच बुधवार पेठ येथील रस्ता रविवारी (दि. ४) अतिवृष्टीमुळे खचला.रस्ता खचण्याचे हे प्रमाण सोमवारी आणखीनच वाढले असून, जवळपास पाच फुटांनी रस्ता खचला आहे. यामुळे प्रशासनाने पन्हाळगडावर पायी जाणेही बंद केले आहे. वीर शिवा काशीद समाधी परिसरात केलेल्या पेव्हिंग ब्लॉकचा रस्ताही खचला आहे. नेबापूर -झाडे चौकीचा परिसरही खचू लागला आहे. गुरुवार पेठेतील काही घरेही खचली आहेत. चार दरवाजा परिसरातील जकात नाक्याची जुनी इमारतही धोकादायक बनली असून, आता तीन दरवाजाकडून बाहेर पडणारा दुसरा रस्ताही गोंधळीवाड्याजवळ खचला आहे. तुरुकवाडीजवळडावरे यांच्या घराजवळ रस्ता खचल्याने पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या तुरुकवाडी, बादेवाडी, घुंगूरवाडी, जेऊर, म्हाळुंगे या गावांकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

दरड कोसळून रस्ता कायमचा बंद होण्याची भीती

पन्हाळगडावरून बुधवार पेठेकडे जाणारा रस्ता खचू लागला आहेच; पंरतु या मार्गावरील तटाकडील बाजूही कोसळण्याची शक्यता आहे. ही दरड कोसळल्यास पन्हाळ्यावरील नागरिक व पर्यटक पूर्णपणे पन्हाळगडावरच अडकणार आहेत. या परिसरात दोन-तीन मोठे दगड रस्त्यावर पडले आहेत. सध्या या ठिकाणी पायीही जाऊ दिले जात नाही. पन्हाळ्याचे नागरिक रविवारी (दि. ४) रात्री आपल्या गाड्या नेबापूर, बुधवार पेठेत लावून चालत गडावर आले; मात्र आज चालत गडावर येण्यासाठी अथवा जाण्यासाठीही मज्जाव करण्यात आला आहे.

पर्यायी रस्त्यांची मागणी

पन्हाळगडावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी अथवा येण्यासाठी पर्यायी रस्त्यांची मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. पन्हाळ्यावरून बाहेर पडण्यास एकही रस्ता नाही. पन्हाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब भोसले यांनी यापूर्वी राजदिंडीमार्गे पन्हाळ्याबाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता करण्याची मागणी केली होती. आता राजदिंडी परिसरातील मार्गही खचू लागल्याने पन्हाळ्याबाहेर पडण्यासाठी एकही सुरक्षित मार्ग उपलब्ध नाही; मात्र केवळ तीन हजार लोकसंख्येसाठी पर्यायी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पन्हाळ्याच्या पर्यायी रस्त्यासंदर्भात साकडे घालण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी सांगितले.

राजकीय उदासीनता

गेले अनेक वर्षे पन्हाळ्यावरील मुख्य रस्ता बंद झाल्यास पर्यायी मार्ग करावा, अशी मागणी आहे; मात्र राजकीय उदासीनता असल्यामुळे पर्यायी रस्त्याबाबत विचार झालेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळण्याबाबत फलक लावले असले, तरी प्रत्यक्ष दरड कोसळल्यास आणीबाणीची परिस्थिती उद्भवणार आहे. अत्यवस्थ रुग्णाला पन्हाळ्याबाहेर काढण्याची सध्या कोणतीही यंत्रणा नाही. याबाबत काय उपाययोजना करणार, असा सवाल पन्हाळ्याचे नागरिक करत आहेत.

‘लोकमत’ने टाकला होता प्रकाश

दरड कोसळून मार्ग बंद होत असल्याने या गंभीर परिस्थितीवर ‘लोकमत’ने ८ जुलै २00४ मध्ये प्रकाश टाकला होता. याबाबत सज्जा कोठी, तीन दरवाजा, लता मंगेशकर बंगला परिसर, जकात नाका, अंबरखाना, कलावंतीणीचा सज्जा, राजदिंडी, पुसाटी बुरुज येथील तटबंदी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती.

 

 

Web Title: With the dredging of the Panhala road, now the cracks started to collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.