कोल्हापूर जिल्हा बँकेत ड्रेसकोड, कर्मचाऱ्यांचा ‘लूक’ बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:31 PM2018-12-18T14:31:54+5:302018-12-18T14:33:39+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दोन गणवेश घेण्याचा निर्णय झाला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची सक्ती केली आहे; त्यामुळे एरव्ही वेगवेगळ्या कपड्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्यांचा लूक बदलला आहे. बोनस ८.५ टक्के देण्याचा निर्णय झाला होता, त्याऐवजी ९ टक्के दिला आणि त्यातून कर्मचाऱ्यानी दोन गणवेश घेण्याचा निर्णय झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत गणवेश सक्तीचे केले असून, बुधवार सवलतीचा दिवस सोडून, इतर दिवशी गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
राष्ट्रीयकृत सह सर्वच सहकारी बॅँकांच्या कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड असतो. कामकाजातील शिस्त म्हणून याकडे पाहिले जात असल्याने जिल्हा बॅँकेनेही कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड करावा, अशी चर्चा बॅँकेच्या २०१७ - १८ च्या सर्वसाधारण सभेत झाली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड सक्तीचा केला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू केली आहे.
सवलतीचा दिवस सोडून अन्य दिवशी गणवेश परिधान न केल्यास प्रत्येक दिवसाला १00 रुपये व त्यावर १८ टक्के प्रमाणे जीएसटी अशी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अहवाल शाखाधिकाऱ्यांनी व्यवस्थापक व प्रशासन विभागास लेखी कळवायचे आहे. त्याची नोंद गोपनीय अहवालात होणार आहे.
तीन वेळा दंड भरूनही चौथ्यांदा गणवेश घातला नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांस कामावर हजर करून न घेता, सदर दिवसाची गैरहजेरी नोंद करून बिनपगारी करण्याच्या सूचना प्रशासनाने शाखाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अधिकारी, लिपिकांनी इनशर्ट व पायात बूट घालण्याची सक्ती आहे, तर शिपायांनाही पायात बुटाची सक्ती करण्यात आल्याने बॅँकेच्या कर्मचाऱ्यांचा एकदम लूक बदलला आहे.
पुढारीपण करणाऱ्यांची गोची
जिल्ह्यातील नेत्यांच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचाच भरणा जिल्हा बॅँकेत अधिक आहे; त्यामुळे अपवाद वगळता बॅँकेचा कर्मचारी हा आपआपल्या गावातील राजकीय नेताच आहे; त्यामुळे त्यांचा पेहरावही पुढाऱ्यासारखाच असतो. या पुढारीपण करणाऱ्यांची मात्र या निर्णयाने गोची झाल्याची चर्चा बॅँकेच्या वर्तुळात सुरू आहे.
फिक्कट जांभळा शर्ट, काळी पँट व गुलाबी साडी
पुरुष कर्मचाऱ्यांना फिक्कट रंगाचा जांभळा शर्ट व काळ्या रंगाची पॅँट दिली आहे. शिपायांना राखाडी रंगाचा ड्रेस दिला आहे. महिला कर्मचाऱ्यांना गुलाबी रंगाची साडी, तर जे कर्मचारी ड्रेस वापरतात त्यांना त्याच रंगाचे ड्रेस दिले आहेत.