ठिबक’चे व्याज शासन भरणार

By admin | Published: October 30, 2016 11:57 PM2016-10-30T23:57:45+5:302016-10-30T23:57:45+5:30

‘चंद्रकांतदादा पाटील : राधानगरीत कार्यक्रम

Dribbike's interest will be paid by the government | ठिबक’चे व्याज शासन भरणार

ठिबक’चे व्याज शासन भरणार

Next

राधानगरी : ग्रामीण भागाच्या व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या तळागाळात पोहोचविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य प्रकारे पार पाडली तर प्रश्नच शिल्लक राहणार नाहीत. जलयुक्त शिवार योजनेच्या यशानंतर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होण्यासाठी ठिबक सिंचनाच्या कर्जाच्या व्याजाचा भार राज्य शासन उचलणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
राधानगरी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नाबार्डकडून राज्यातील रस्त्यांसाठी १३०० कोटी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यासाठी यातून २२० कोटी मिळणार आहेत. शिवाय अ‍ॅन्युटी या खासगी कंपन्यांच्या सहभागातून राज्यात पंधरा हजार कोटींचे पाच हजार कि.मी. रस्ते होतील. यातून काही रस्ते प्रशस्त होतील. याचा दळणवळण सुखकर होण्यास फायदा होईल. नाबार्डच्या निधीतून कसबा तारळे पुलाला आठ कोटी व सोन्याची शिरोली-कुडुत्री गैबी बोगदा ओढा पुलाला एक कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली.
पंचायत समिती आवाराच्या संरक्षण भिंतीला पस्तीस लाख रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पर्यटन विकासाला संधी असल्याने त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. भुदरगड व राधानगरीला जोडणारा वाकीघोल रस्ता मंजूर करावा.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, दुर्गम भागात शिक्षक फार वेळ राहत नाहीत. यासाठी बदलीच्या कायद्यात बदल करावा. साखर कारखानदार व शेतकऱ्यांत दराबाबत दादा मध्यस्थी करणार आहेत. ते स्वत: कारखानदार नसल्याने शेतकऱ्यांची बाजू घेतील.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पूर्वीच्या काळातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आता वाहतुकीला अडथळे ठरत आहेत. त्यांच्या मजबुतीकरणासाठी विशेष प्रयत्न व्हावेत.
यावेळी मुख्य इमारतीचे उद्घाटन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. राधाबाई महाराज महिला कक्षाचे उद्घाटन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. राजर्षी शाहू सभागृहाचे उद्घाटन माजी आमदार पी. एन. पाटील यांनी व राजाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. सभापती जयसिंग खामकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, नामदेवराव भोईटे, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, हिंदुराव चौगले, ए. वाय. पाटील, पी. डी. धुंदरे, दीपा पाटील, कुणाल खेमनार, संगीता कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dribbike's interest will be paid by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.