रंकाळ्याचे पाणी होणार पिण्यायोग्य
By admin | Published: May 27, 2015 12:28 AM2015-05-27T00:28:57+5:302015-05-27T00:57:10+5:30
हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन तंत्रज्ञान : रसायन तंत्रज्ञान संस्थेचा पुढाकार
संतोष पाटील - कोल्हापूर -कोल्हापूरचे सुपुत्र व मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आय.सी.टी.) कुलगुरू जी. डी. यादव यांच्या प्रयत्नांमुळे रंकाळ्याचे पाणी पिण्या योग्य शुद्ध होणार आहे. आय.सी.टी.चे प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांच्या हायड्रो डायनॅमिक कॅविटेशन या तंत्रज्ञानावर आधारीत उपकरण रंकाळ्याच्या काठावर बसविण्यात येणार आहे. यासाठी लागणारा २५ लाखांचा निधी यादव यांनी सेवाभावी संस्थांकडून उपलब्ध केला आहे. महापालिका फक्त वीज व अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून देणार आहे. या मोहिमेस १४ जूनपासून सुरुवात होत आहे.
कुलगुरू यादव हे अर्जुनवाड (ता. राधानगरी) येथील आहेत. कोल्हापूरसाठी काहीतरी करायचे या भावनेतून त्यांनी आय.सी.टी.चे प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित रंकाळ्याचे अशुद्ध पाणी कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना शुद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अडीच वर्षे पाठपुरावा के ला. प्रकल्पासाठी आवश्यक २५ लाखांचा निधी मुंबईतील आरती ग्रुपचे चंद्रकांत गोगरी, राजेंद्र गोगरी, परिमल देसाई, रत्नाकर बांदोडकर, प्रकाश पाटील यांच्याकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी (सीआरएस)च्या माध्यमातून उपलब्ध केला. यासाठी समन्वयाची जबाबदारी आय.सी.टी.कोल्हापूर माजी विद्यार्थी संघटनेचे प्रा. अमर जाधव यांनी पार पाडली आहे. प्रकल्पाचे सादरीकरण प्रा. पंडित यांच्या उपस्थितीत ६ जूनला महापालिकेत होणार आहे, तर प्रकल्पाचे उद्घाटन व सुरुवात १४ जूनला सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
असे होणार शुद्धिकरण
रंकाळ्यात तब्बल ४३ लाख ५० हजार १४१ घनमीटर इतकी पाणी साठविण्याची क्षमता आहे. सरासरी २७ लाख ४५ हजार घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असतो. सुरुवातीस रंकाळ्याच्या काठावर हायड्रो डायनॅमिक कॅविटेशन रिअॅक्टर व एक पंप ठेवला जाईल. या माध्यमातून तासाला एक दशलक्ष लिटरप्रमाणे पाण्याचा उपसा करून त्याचे शुद्धिकरण करून ते पाणी पुन्हा रंकाळ्यात सोडले जाईल. रिअॅक्टरमध्ये सेकंदाच्या शंभराव्यापेक्षाहीकमी वेळेत पाणी दहा हजार अंश सेल्सियस तापमानावर गरम होऊन थंड होईल. यावेळी पाण्यातील दूषित घटक मरून जातील. यासाठी कोणतीही रासायनिक प्रक्रिया व घटकांचा वापर केला जाणार नाही. सुरुवातीस एक व त्यानंतर गरजेनुसार आवश्यक रिअॅक्टर बसविण्यात येणार आहेत. सहा ते आठ महिन्यांत पहिल्या टप्प्यात सर्व रंकाळ्यातील पाणी शुद्ध होईल. त्यानंतर गरजेनुसार दररोज काही तास ही यंत्रणा सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी दिली.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
३० बाय १५ फूट जागा
थ्री फेज ४० एचपी वीज
फक्त एक आयआटीआय फिटर कामगार चालविणार युनिट
तासाला विजेचा २०० रुपये खर्च
एका तासात एक दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धिकरण
कोणत्याही रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर नाही
शेवाळ, हायसिंथ व इतर प्रदूषित घटकांचा पूर्णत: नाश
सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण तलावातील पाण्याचे
शुद्धिकरण शक्य
शुद्धिकरणानंतर पाणी पिण्यासह अंघोळीसाठी वापरण्यायोग्य.