सातेरी-महादेव परिसरात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर

By admin | Published: May 4, 2016 11:45 PM2016-05-04T23:45:14+5:302016-05-05T00:50:50+5:30

पाण्याची पातळी कमी : सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद

Drinking water question in the Satari-Mahadev area is serious | सातेरी-महादेव परिसरात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर

सातेरी-महादेव परिसरात पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर

Next

शिवराज लोंढे -- सावरवाडी तीव्र स्वरूपाचा उन्हाळा अन् वाढता हवेतील उष्मा, अंगाची लाही लाही होणारे वातावरण यामुळे तहानलेल्या जिवाची तहान भागविणे कठीण बनले आहे. सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडू लागल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने सार्वजनिक नळपाणी योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. जनतेच्या पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला असल्याने सातेरी-महादेव (ता. करवीर) या डोंगरी भागातील वाड्यावस्त्यामधील गावांना ऐन उन्हाळ््यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
सन १९७२ नंतर यावर्षी भयानक स्वरूपाचा दुष्काळ जाणवत आहे. शेती व्यवसायाला पाणी मिळत नाही. तसेच पिण्याचा पाणीप्रश्नही भेडसावत आहे. अपुऱ्या पावसामुळे सातेरी-महादेव डोंगरी भागात भूगर्भातील पाण्याची पातळी घट्ट झाली. त्यामुळे सार्वजनिक विहिरीतील पाण्याने तळ गाठला गेला. परिणामी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडू लागल्या आहेत.
गेल्या मार्च महिन्यापासून सातेरी-महादेव डोंगरी भागातील धोंडेवाडी, नरगेवाडी, केकतवाडी, बेरकळवाडी या गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. एप्रिल महिन्यात कडक उन्हाळा पडल्याने पिण्याचा पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. घरटी चार घागरी पाणी वाटपामुळे पिण्याच्या पाण्यासाठी मात्र डोंगरी लोकांचे हाल होत आहेत.
सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या नळांना बोटाएवढी पाण्याची धार येते. त्यामध्ये गल्लीवार पाण्याच्या पाळ््या बनवून रात्रंदिवस घागरीने पाण्याचे वाटप सध्या सुरू आहे. घरटी चार घागऱ्या पाण्यामुळे कुटुंबाचा प्रपंच कसा चालवायचा हा प्रश्न महिलांसमोर उभा राहिला आहे. बैलगाडीतून नदीकाठच्या गावातून ग्रामस्थ पाणी नेत आहेत.
सातेरी-महादेव डोंगरी भागातील गावांचा कायमस्वरूपी पिण्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी भोगावती नदीतून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. डोंगरातील झऱ्यातून पाणी कमी येते. दरवर्षी मार्च महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न डोंगरी भागातील लोकांना थंडावत असतो. शिवाय पाणी टंचाईग्रस्त गावांतील कूपनलिका खुदाईची कामेही शासकीय पातळीवर रेंगाळलेली आहेत.


दिवसाला चार घागरी पाणी
डोंगरी भागात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला गेला. सार्वजनिक नळ योजनेद्वारे बोटभर पाणी येत असते. घरोघरी पाण्याच्या चार घागरी वाटप केल्याने लोकांची तहानही भागू शकत नाही. पाण्यासाठी रात्रंदिवस जागावे लागते.

Web Title: Drinking water question in the Satari-Mahadev area is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.