चालक कांबळे पुढील उपचारासाठी जे.जे.रुग्णालयात
By Admin | Published: May 29, 2017 04:11 PM2017-05-29T16:11:24+5:302017-05-29T16:11:24+5:30
उमा चित्रमंदिर चौकातील अपघात प्रकरण, खाते निहाय चौकशी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९ : उमा चित्रमंदिर या नागरिकांनी गजबजलेल्या चौकात एस. टी. बस दुर्घटनेतील चालक रमेश सहदेव कांबळे यांना बे्रन ट्यूमर झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) यांच्यावतीने कांबळे यांच्यावरील पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रविवारी रात्री हलविण्यात आले.
गेल्या आठवड्यात हुपरी ते रंकाळा या एस. टी. बसने कोल्हापुरात उमा चित्रमंदिर चौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनांना पाठीमागून चिरडले. या दुर्घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दहा वाहनधारक जखमी झाले. दुर्घटनेतील जखमी बसचालक रमेश कांबळे यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना चालक कांबळे यांच्या डोक्यात समोरील डाव्या बाजूस मेंदूत सुमारे ४ बाय ३ सेंमी इतक्या आकाराची गाठ (ब्रेन ट्यूमर) दिसून आला होता.
याबाबत अत्याधुनिक तपासणी आणि उपचार मुंबईतील जे. जे. रुग्णालायत उपलब्ध असल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) यांच्यावतीने चालक रमेश कांबळे यांना पुढील उपचारासाठी रविवारी सांयकाळी मुंबईला पाठविण्यात आले आहेत. या ठिकाणी होणारा उपचारावरील सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार आहे.
अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल एस. टी. बसचालक रमेश कांबळे याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह कांबळे यांची खाते निहाही चौकशी सुरु आहे. अपघातानंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये कांबळे यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निष्पण झाले आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे.
नवनीत भानप,
विभाग नियंत्रक कोल्हापूर