वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:23 AM2021-05-23T04:23:31+5:302021-05-23T04:23:31+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची पहिल्या लाटेनंतर अवघ्या काही महिन्यांतच दुसरी लाट आली. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी, वडाप ...
कोल्हापूर : कोरोना संसर्गाची पहिल्या लाटेनंतर अवघ्या काही महिन्यांतच दुसरी लाट आली. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी, वडाप जीप, खासगी कार भाड्याने देणाऱ्या चारचाकींवर निर्बंध आले. त्याचा परिणाम म्हणून अशी वाहने जागेवरच आहेत. दारात उभ्या असलेल्या वाहनातून घरातील नातेवाइकाला जरी रुग्णालयापर्यंत न्यायचे म्हटले तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहन थांबवून ठेवल्यामुळे टायरमधील हवाही कमी झाली आहे. हवा भरावयाची म्हटले तर पंक्चरवाल्यांची दुकानेही बंद आहेत. त्यात गाडीच बंद पडली तर ती दुरुस्ती करण्यास गॅरेजही उघडी नाहीत. एका बाजूने वाहने थांबल्यामुळे उत्पन्न नाही आणि घरखर्चासह कर, दुरुस्ती देखभाल खर्च वाढू लागला आहे. एकूण व्यवसायच कात्रीत सापडला आहे.
वाहने सुरू, पण गॅरेज बंद
अत्यावश्यक सेवेखाली अनेक दुचाकी व चारचाकी रस्त्यावर आहेत. मात्र, वाहनांमध्ये बिघाड झाल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी गॅरेज उघडी नाहीत. जागेवर मेकॅनिकही नाही. अशा परिस्थितीत बिघडलेली वाहने दुरुस्त कशी करावयाची, असा प्रश्न आहे. वाहनांमध्ये ब्रेक न लागणे, व्हील अलायन्मेंट नसणे, क्लच अडकणे, टायर एका बाजूने झिजणे, अॅक्सल तुटणे, रेडीएटर गरम होणे, वाहनच सुरू न होणे, बॅटरी डिसचार्ज होणे, आदी समस्यांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे.
वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर
प्रवासी वाहतुकीकरिता घेतलेल्या वाहनाच्या कर्जाचे हफ्ते तटल्यामुळे वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी वारंवार हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. घरचा खर्च कसा चालवायचा, दुरुस्ती देखभाल खर्चही कसा भागवायचा, याशिवाय आरटीओचा कर, वाहनाचा विमा, दरवर्षीचे पासिंग कसे करायचे, अशा विविध अडचणी आहेत.
गॅरेज बंदमुळे गॅरेजमालकांचीही उपासमार
जिल्ह्यात १२०० हून अधिक दुचाकी गॅरेज आहेत, तर चारचाकी आहेत. या सर्वांवर किमान १५ हजारांहून अधिकजण निर्भर आहेत. या गॅरेज चालकांंना एक फोन केल्यानंतर ते ज्या ठिकाणी गाडी बंद पडली असेल, त्या ठिकाणी येऊन वाहन दुरुस्ती करून देतात. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्हा प्रशासनाने गॅरेज बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच ते सहा महिने गॅरेज बंद होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून दुसऱ्या लाटेमुळे गॅरेज बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे घर संसार, गॅरेजचे भाडे, वीज बिल, आदी कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गॅरेजवाल्यांचे पोटपाणी बंद
प्रतिक्रिया
शहरासह जिल्ह्यात सुमारे १२०० हून अधिक दुचाकी गॅरेज आहेत. मालकासह किमान चारजणांचे पोट या व्यवसायवर निर्भर आहे. लॉकडाऊनमध्ये गॅरेज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यात व्यवसायावर गंडांतर आले आहे. घरखर्चासह नोकर पगार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने गॅरेजचालकांना आता मदतीचा हात द्यावा.
संतोष हराळे, संघटक, कोल्हापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन
प्रतिक्रिया
प्रशासनाची गॅरेज बंद ठेवण्याची बाजू योग्य आहे. तरीसुद्धा अडचणीत आलेल्या वाहनधारकांना मदत करणे गरजेची बाब आहे. त्यासोबतच गॅरेज मालकांनी काढलेल्या कर्जांचे हप्ते लाॅकडाऊनमुळे थकले आहेत. या सर्वांचा विचार करून सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.
सुधीर महाजन, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा फोरव्हीलर मेकॅनिकल वेल्फेअर असोसिएशन
वाहने पार्किंगमध्येच
प्रतिक्रिया
जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीही बंद आहेत. मागील लाॅकडाऊनमध्ये वयाेमर्यादा ओलांडलेल्या टॅक्सीचे नूतनीकरण केले आहे. त्याचे पैसे अजूनही व्यवसायातून निघालेले नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने टॅक्सीधारकांनाही रिक्षाचालकांप्रमाणे अनुदान द्यावे.
अशोक जाधव (जेके), उपाध्यक्ष, टॅक्सी टुरिंग युनियन
वाहन संख्या अशी,
दुचाकी - १२ लाख २१ हजार ८३७
चारचाकी - १ लाख ४२ हजार ६६५
जीप, ओमनी बस - २१ हजार २६७
रिक्षा - १८ हजार ८२१
रुग्णवाहिका - ४५८
ट्रक , लॉरी - १८ हजार २३२
डिलिव्हरी व्हॅन - २४ हजार ६१२
ट्रॅक्टर - ४३ हजार ४०२
ट्रॉली - ३२ हजार १७६
लक्झरी कॅब, टुरिस्ट कॅब - १४२१
मीटर टॅक्सी- १२२