टिपरवरील चालकांचे काम बंद आंदोलन : कचरा उठावाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:26 PM2020-01-18T15:26:46+5:302020-01-18T15:28:12+5:30
कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपरवर चालकांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला.
कोल्हापूर : शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपरवर चालकांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला.
ठेकेदाराने पगार त्वरीत देण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांनी कामाला सुरवात केली. दरम्यान, तीन तास त्यांनी शास्त्रीनगर येथील केएमटीच्या वर्कशॉपमध्ये ठिय्या आंदोलन केले. यामुळे कचरा उठावावर काहीकाळ परिणाम झाला.
महापालिकेने वाहनांवरील चालक नियुक्तीचा ठेका डी.एम. एंटरप्रायझेस या कंपनीला दिला आहे. यामध्ये महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी यांच्या वाहनांसह १0४ टिपरांचाही समावेश आहे. चालकांच्या पगाराची जबाबदारी ठेकेदाराची आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्यावरुन शनिवारी सकाळी चालकांनी काम बंद आंदोलन केले. तसेच कमी पगार देत असल्याच्याही तक्रार आहेत. केएमटीच्या वर्कशॉपमध्ये टिपर ताब्यात घेण्यास नकार दिला. तसेच परिसरात ठिय्या आंदोलन केले. याची माहिती महापालिका प्रशासनाला होताच त्यांची चांगलीच धावपळ झाली.
तीन तास कचरा उठाव ठप्प
संबंधित ठेकेदाराने वर्कशॉपमध्ये येऊन चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते. अखेर तात्काळ पगार देण्याची ग्वाही दिल्यानंतर चालकाने आंदोलन मागे घेतले.
दररोज सकाळी ६ वाजता टिपर शहरातील कचरा उठावासाठी बाहेर पडतात. या आंदोलनामुळे तीन तास काम ठप्प राहिले. सकाळी ९ नंतर चालकांनी टिपर ताब्यात घेऊन कामाला सुरवात केली.