वाहनचोरीची तक्रार आता थेट घरातून
By admin | Published: November 13, 2016 12:54 AM2016-11-13T00:54:18+5:302016-11-13T01:19:01+5:30
तक्रार नोंदीसाठी वेबसाईट सुरू : वरिष्ठ अधिकारी देणार वैयक्तिक लक्ष - संडे स्पेशल
एकनाथ पाटील -- कोल्हापूर --वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कच्ची नोंद न घेता आता तत्काळ गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांना पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार देण्यासाठी यावे लागणार नाही. त्यांचा वेळ व पायपीट थांबण्यासाठी पोलिस प्रशासनाने ६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मे ही वेबसाईट सुरू केली आहे. घरी बसून नागरिकांनी तक्रार दिल्यास, तत्काळ तिची दखल घेतली जाणार आहे. त्यामुळे तक्रारदारांची होणारी ससेहोलपट आता थांबणार आहे.
जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये रोज एक-दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची नोंद होत असते. एखादी व्यक्ती रस्त्यावर मोटारसायकल लावून काम आटोपून परत येईपर्यंत ती त्या जागी असेल याची हमी आता देता येत नाही. मोटारसायकल कर्ज काढून घेतलेली असते. ती चोरीस गेली की वाहनधारक पुरता हतबल होतो. आठवडा बाजार, बसस्थानक, सिनेमागृह, आदी ठिकाणच्या गर्दीचा फायदा घेत मोटारसायकल चोरणारी टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे.
वाहन चोरीस गेल्यानंतर व्यक्ती पोलिस ठाण्याकडे धाव घेते. तिथे बसलेले ठाणे अमलदार तक्रार दाखल करून घेण्याऐवजी मार्गदर्शन करण्यातच वेळ घालवितात. शोध घ्या, वाहनाचा विमा नसल्याने आपण अडचणीत याल, वाहन मिळाल्यास न्यायालयात हेलपाटे मारावे लागतील, अशी अनेक कारणे सांगून तक्रारदाराची कच्ची नोंद घेऊन गुन्हा रजिस्टरवर आणला जात नाही. गुन्हा दाखल न झाल्याने त्याचा शोधही कोणी घेत नाही. तक्रारदार वाहन मिळेल या अपेक्षेपोटी पोलिसांच्या फोनची वाट पाहत असतो; परंतु आठ ते दहा दिवस उलटले तरी पोलिस ठाण्यातून कोणताही संपर्क त्यांच्याशी साधला जात नाही. अखेर तक्रारदार पोलिस ठाण्याची वाट धरतात. तिथे चौकशी केली असता अद्याप वाहन मिळून आलेले नाही. अमुक पोलिस ठाण्यात वाहनचोर मिळून आला आहे. त्याच्याजवळ मिळालेल्या वाहनामध्ये तुमची मोटारसायकल आहे का, याची खातरजमा करून या, असे सांगितले जाते. तेथून पुन्हा ती व्यक्ती संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली असता तेथेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. अखेर पंधरा ते वीस दिवसांनी गुन्हा दाखल केला जातो. या मधल्या कालावधीत तक्रारदार वैतागून जातो. वाढत्या वाहनचोरीच्या प्रकरणामुळे पोलिस महासंचालक कार्यालयाने वाहनचोरीच्या तक्रार नोंदीसाठी थेट वेबसाईट सुरू केली आहे. ६६६.५ंँंल्लूँङ्म१्र३ं‘१ं१.ूङ्मे या बेवसाईटवर आता नागरिकांना घरी बसून तक्रार नोंदविता येणार आहे. त्यांची ही तक्रार आॅनलाईन असल्याने ती राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांत दिसणार आहे.
जनजागृती करण्याच्या सूचना
वाहनचोरीच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सुरू करण्यात आलेली वेबसाईट नागरिकांना माहीत व्हावी, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. या वेबसाईटवर तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यावर वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अशी होते चोरी... : वाहनधारक गडबडीने मोटारसायकल रस्त्यावर पार्क करून जातो. यावेळी चोरटे पाळत ठेवून असतात. कोणाला शंका येऊ नये, यासाठी मोबाईलवर बोलत असल्याचे दाखवतात. आजूबाजूला कोणी आहे का, याची चाचपणी होते. त्यानंतर एखादी पेट्रोल असलेली मोटारसायकल हेरून तिच्या शेजारी घुटमळायचे. कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून मोटारसायकलीच्या पुढल्या चाकावर जोरात लाथ मारून लॉक तोडले जाते. काही सेकंदांत स्विचची केबल तोडून ती थेट जोडली जाते. त्यामुळे सहजरीत्या मोटारसायकल चालू होऊन ती घेऊन चोरटा पसार होतो. सदर बझार येथील आठजणांच्या टोळीने अशा प्रकारे चाळीसपेक्षा जास्त मोटारसायकलींची चोरी केली होती.
वाहनचोरीच्या तक्रारी वेबसाईटवर नोंदविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांनी दिल्या आहेत. पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अंमलबजावणी करीत आहेत. नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंद करता येणार आहेच.
-प्रदीप देशपांडे,
पोलिस अधीक्षक