पन्हाळ्यातील ८४ गावांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:39+5:302021-03-17T04:23:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क देवाळे :पन्हाळा तालुक्यातील ८४ गावांमधील गावठाण हद्दीचे आधुनिक पद्धतीच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी भूमी अभिलेख व ...

Drone survey of 84 villages in Panhala will be conducted | पन्हाळ्यातील ८४ गावांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

पन्हाळ्यातील ८४ गावांचे होणार ड्रोनद्वारे सर्वेक्षण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

देवाळे :पन्हाळा तालुक्यातील ८४ गावांमधील गावठाण हद्दीचे आधुनिक पद्धतीच्या ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी भूमी अभिलेख व नगरमापन विभागाच्या यंत्रणेने तयारी केली आहे. मानवी चुका टाळून अचूक आणि गतीने हे काम केले जाणार आहे. त्यातून ग्रामस्थांना सनद, मिळकत, पत्रक, नकाशे असे मालकी हक्क सिद्ध करणारे दस्तऐवज दिले जाणार असल्याची माहिती पन्हाळा भूमी अभिलेख उपअधीक्षक सुनील लाळे यांनी मंगळवारी दिली.

या ड्रोन सर्वेक्षणासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी अमित माळी हे समितीचे अध्यक्ष असून लाळे हे सदस्य सचिव राहणार आहेत. या समितीत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंतराव निकम, गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे, ग्रामविस्तार अधिकारी सदस्य असणार आहेत.

शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम भूमी अभिलेख, ग्रामविकास विभाग आणि केंद्र शासनाच्या सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविला जाणार आहे. त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षित केले आहेत. सर्वेक्षण करण्याच्या एक दिवस अगोदर त्या गावामध्ये जनप्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी आपापल्या मालमत्तांचे सीमांकन करून घ्यायचे आहे. बाहेरगावी असणाऱ्या ग्रामस्थांना त्याची आगाऊ माहिती द्यावयाची आहे. शासकीय जागा, ग्रामपंचायतीच्या जागा, सार्वजनिक वापराच्या जागांचे सीमांकन सर्वेअर आणि तलाठी यांच्या मदतीने करून घेतले जाणार आहे.

गावठाणातील जागांबाबत वाद असल्यास त्या तक्रारीची चौकशी करून योग्य तो निर्णय झाल्यानंतर अशा जागांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीसपाटील व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वपूर्ण असणार असल्याचे भूमी उपअधीक्षक लाळे यांनी सांगितले.

चौकट :

ड्रोनची आधुनिकता

पूर्वी पारंपरिक पद्धतीने चार हजार गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी १०० वर्षे लागली. मात्र आता ड्रोनद्वारे आधुनिक पद्धतीने राज्यातील ४० हजार खेडी, गावांचे सर्वेक्षण अवघ्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.

चौकट:

ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणात अधिक अचूकता असणार आहे. मानवी चुकांना यामध्ये स्थान असणार नाही. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाला आपल्या हक्काच्या मिळकतीची सनद, मिळकतपत्र आणि नकाशा मिळणार आहे.

Web Title: Drone survey of 84 villages in Panhala will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.