दुष्काळी माणला अवकाळीचा फटका!
By admin | Published: January 2, 2015 11:37 PM2015-01-02T23:37:30+5:302015-01-03T00:11:01+5:30
ज्वारी आडवी : मका, फळबागांचेही नुकसान
म्हसवड : म्हसवड शहर आणि देवापूर, पळसावडे, ढोकमोड परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल खात्याने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सलग तीन वर्षांच्या भीषण दुष्काळानंतर यंदाच्या रब्बी हंगामातील पिके जोमदार आली होती. मागील तीन वर्षे रब्बी हंगाम वाया गेला होता. परंतु, यंदा रब्बी पिके जोमदार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच गुरुवारी दुपारी अर्धा तास सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने ज्वारीचे पीक पूर्णपणे झोपले. मका आडवा झाला, तर डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा
प्रादुर्भाव झाला. द्राक्षबागांतील मणी चिरल्याने द्राक्ष बागायतदारांचेही नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वाऱ्यामुळेही पिके आडवी झाली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महसूल खात्याने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी माणदेशी शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)