दुष्काळी भाग ढबूकडे, पण दराने मोडले कंबरडे
By admin | Published: September 20, 2015 10:44 PM2015-09-20T22:44:49+5:302015-09-20T23:27:48+5:30
उत्पादनात वाढ : दर घसरल्याने शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच; बाजारातील आवक वाढली
गजानन पाटील -- संख---डाळिंब, द्राक्षे व इतर भाजीपाला पिकांऐवजी कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल ढबू मिरची उत्पादनाकडे वाढला आहे. हे अधिक उत्पन्न देणारे पीक असल्याने यावर्षी उत्पादन क्षेत्रात वाढ झाली आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत विक्रमी उत्पादन घेतले आहे. उत्पादन क्षेत्रात वाढ झाल्याने बाजारात मोठी आवक झाल्याने ढबू मिरचीचा दर दहा रुपयांपर्यंत घसरला आहे. आतापर्यंतचा हा सर्वात नीचांकी दर आहे. औषधे, खते, मशागतीचा खर्च, मजूर यांचा खर्च वजा जाता, उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात कोणतीही पिके न करता विहीर, कूपनलिकेतील पाण्यावर ढबू मिरचीची लागण केलेली आहे. बाजारात गेल्या चार वर्षापासून दर चांगला मिळाला आहे. पारंपरिक पिके न घेता नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन देणारी नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या दावण्या, बिब्ब्या या रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष, डाळिंब फळबागा धोक्यात आल्या आहेत. बेदाण्याला योग्य दर मिळत नाही. द्राक्षाचा उत्पादन खर्च वाढला. पण दर तोच राहिल्याने द्राक्षशेती न परवडणारी बनली आहे. त्यामुळे शेतकरी इतर भाजीपाला पिकाकडे वळला आहे.
तालुक्यातील रामपूर, सोन्याळ, दरीकोणूर, कोळगिरी, खलाटी, माडग्याळ, जत, शेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी द्राक्षे, डाळिंब आदी पिकांच्या शेतीला पर्याय म्हणून ढबू मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. इंदिरा, आयेशा, इंडस या जातीच्या ढबू मिरचीचे उत्पादन घेतले जाते. रोहिणी हंगामात ढबू मिरचीची लागण केली जाते. पाच महिन्यांमध्ये उत्पादन येते. अनुकूल वातावरणामुळे चांगले उत्पादन आले आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यांनी सेंद्रीय, रासायनिक खते, महागड्या औषधांचा वापर केला आहे. चांगली दर्जेदार व गुणकारी अशी बायो ३०३ आर, केवर कवच, आॅट्रा, जंप आदी महागड्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन मिळाले आहे. एक एकर ढबूची लागण करण्यासाठी मल्चिंग पेपर, ठिंबक संच, तार, बांबूच्या काठ्या, बेड मारणे, बांधणी, सुतळी याचा दीड लाखापर्यंत खर्च येतो. तसेच मजूर, महागडी औषधे, सेंद्रीय व रासायनिक खते यांचा सुमारे एक लाखापर्यंत खर्च जातो. असा एकरास अडीच लाख रुपये खर्च येतो. मात्र आता मिळणारा ढबूचा दर पाहता, ढबू उत्पादनासाठी केलेला खर्च तरी निघणार का? असा प्रश्न पडला आहे. माल पॅकिंग करून पाठविला जातो. साधारणत: ३० किलोचा बॉक्स असतो. हा माल मुंबई, पुणे, दिल्ली, बेळगाव, नागपूर, कोलकाता, जबलपूर आदी ठिकाणी ट्रान्स्पोर्टमार्फत पाठविला जातो.
शेतकऱ्यांनी हिमतीने भरघोस उत्पादन आणले आहे. पण बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने दराची घसरण झालेली आहे. गेल्या चार वर्षातील हा सर्वात नीचांकी दर आहे. जुलैमध्ये २० रुपये किलो असणारा दर आता ९ रुपयांवर आला आहे. १ ते ८ आॅगस्टपर्यंत २० रुपये, ८ ते ११ आॅगस्टपर्यंत १९ रुपये, १९ ते २१ आॅगस्ट १२, २१ ते २८ आॅगस्टअखेर ९ रुपये, १ ते १५ सप्टेंबरअखेर १० ते १२ रुपये प्रति किलो असा दर घसरला आहे. बॉक्स पॅकिंग, मजूर, मशागती, वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्याच्या हाती ४ ते ५ रुपये येतात.
यावर्षी मोठ्या कष्टाने, मेहनतीने ढबू मिरचीचे भरघोस उत्पादन आणले आहे. उन्हाळ्यात इतर कोणतेही पीक न करता ढबू मिरची केली आहे. उभारणीसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत. शेवटपर्यंत असाच दर मिळाला, तर जेमतेम पैसे मिळणार आहेत. खर्च पण निघणार नाही. कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.
- अशोक मिसाळ,
ढबू उत्पादक शेतकरी, दरीकोणूर
पाकिस्तानात निर्यातबंदी
ढबू मिरचीची निर्यात पाकिस्तानलाही केली जाते. मात्र पाकिस्तान व भारत यांच्यातील बैठक फिसकटल्याने आॅगस्टपासून भारत व पाकिस्तान यांच्यात निर्यातबंदी आहे. त्यामुळे मालाचा उठाव होत नाही. याचा फटकाही ढबू उत्पादकांना बसला आहे, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.