यड्रावचा दुष्काळ रस्ता पुन्हा उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:55+5:302021-05-29T04:19:55+5:30
यड्राव : येथील दुष्काळ रस्ता निकृष्ट दर्जामुळे वर्षात दोनवेळा उखडला असल्याने या कामाच्या दर्जाबाबत तक्रार झाली आहे. असे असतानाही ...
यड्राव : येथील दुष्काळ रस्ता निकृष्ट दर्जामुळे वर्षात दोनवेळा उखडला असल्याने या कामाच्या दर्जाबाबत तक्रार झाली आहे. असे असतानाही प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यड्राव येथील शेतवडीकडे जाणाऱ्या जांभळी हायस्कूल ते घाट मळा या दरम्यान असणाऱ्या दुष्काळ रस्ता मुरुमीकरण व खडीकरण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार हा रस्ता तत्कालीन जि. प. बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्या फंडातून करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा माजी आमदार उल्हास पाटील यांच्या फंडातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले. या रस्त्यासाठी १० लाख रुपये निधी मंजुरीतून ६० मीटर खडीकरण आणि मुरमीकरण करण्यात आले आहे. हे कामही ठेकेदाराकडून दर्जेदार झाले नसल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्याने आॅक्टोबरमध्ये ठेकेदाराने या मार्गावर मुरूम टाकून रोलिंग केले होते. परंतु हे कामदेखील निकृष्ट पद्धतीने झाल्याने पुन्हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. यामुळे या रस्त्यावरून शेतवडीकडे जाणे अत्यंत गैरसोयीचे व धोकादायक बनले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कोट - या दुष्काळी रस्त्यावर खडीकरण व मुरमीकरण केले तरीसुद्धा काही दिवसांत तो नेहमीच उखडला जातो. हा कायमचा त्रास सोडविण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली असता त्यांनी हा रस्ता डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे.
- रमेश माने, शेतकरी यड्राव
फोटो - २८०५२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथील शेतवडीकडे जाणारा दुष्काळ रस्ता पुन्हा उखडल्याने यामुळे शेतकरी बांधवांना ये-जा करणे अडचणीचे व धोकादायक बनले आहे.