मंडळांची ढोल-ताशाला पसंती : डॉल्बीला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:38 AM2017-08-26T00:38:56+5:302017-08-26T00:42:11+5:30
कोल्हापूर : यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा कडकडाटासह पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती दिली. ‘
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मंडळांनी ढोल-ताशांचा कडकडाटासह पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती दिली. ‘मोरया मोरया,’ ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयजयकार करीत शहरात बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांनी पावसामुळे रात्री उशिरा गणरायाचे स्वागत केले. बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच स्वागत मिरवणूक काढणे पसंत केले. काही मंडळांच्या गणेशमूर्ती लवकर तयार न झाल्याने उशिरापर्यंत ‘श्रीं’चे आगमन सुरू होते.
आकर्षक फुलांनी सजविलेली ट्रॅक्टर-ट्रॉली, वाहने घेऊन गणरायाला आणण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दुपारी चारनंतर बाहेर पडले. पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, उचगाव या ठिकाणी मंडळांनी गर्दी केली होती. अनेक मंडळांनी आगाऊ नियोजन करून गणेशमूर्ती पावसात भिजू नये म्हणून मूर्तींच्या आकाराच्या प्लास्टिकच्या पिशव्या घेतल्या होत्या. ढोल-ताशा पथक, छोट्या साउंड सिस्टीम, झांजपथक , लेझीम पथक, बेंजो पथक या पारंपरिक वाद्याच्या गजरावर पावसातही कार्यकर्त्यांनी नृत्याचा फेर धरला होता.
काही कार्यकर्ते हातात मंडळाचे ध्वज आणि कपाळावर ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या पट्ट्या व टोप्या घालून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील तरुण मंडळांनी गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी मार्गावरून स्वागत मिरवणूक काढली. बिंदू चौक, शिवाजी रोड, शिवाजी चौक, उमा टॉकीज, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, सुभाष रोड, आदी मार्गांवरून मंडळांची अधिक वर्दळ होती. शुक्रवारी शाहूपुरी येथील राधाकृष्ण तरुण मंडळ, संभाजीनगर येथील आयडियल स्पोर्टस, तर मंगळवार पेठेतील जासूद गल्ली मित्रमंडळ, दत्ता काशीद मित्रमंडळ, बजापराव माने तालीम मंडळ,
कलकल मित्र मंडळ, चाणाक्य तरुण मंडळ, प्रतापसिंह तरुण मंडळ, हिंदवी स्पोर्टस, हिंद तरुण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंंडळ, धर्मराज तरुण मंडळ, गुडलक तरुण मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, महादेव तरुण मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, महाकाली तालीम मंडळ (शिवाजी पेठ), युवा गु्रप, मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, सोल्जर गु्रप, बालगोपाल तालीम मंडळ, जय शिवराय मित्र मंडळ, कलकल गु्रप यांचा समावेश होता. ही आगमनाची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांच्या हाकेला मंडळांची साद
यंदा डॉल्बीच्या दोन बेस दोन टॉपपेक्षा पारंपरिक वाद्यांना मंडळांनी अधिक पसंती दिल्याने शहरासह जिल्ह्यातून आलेल्या ढोल-ताशा पथकांना सुगीचा दिवस होता. त्यामुळे अगदी २५०० पासून १५००० रुपये एका मिरवकीचाणु दर या ढोल-ताशा पथकांना मिळाला. त्यात बेंजोपथक, बँडपथक यांनाही चांगले काम मिळाले. त्यामुळे पापाची तिकटी, बापट कॅम्प, शाहूपुरी, आदी परिसरात ढोल-ताशासह झांजपथकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत होते.
शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक मंडळांनी आपल्या गणेशमूर्तीचे पावसापासून संरक्षण व्हावे याकरिता मूर्तीच्या त्या-त्या आकाराप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्यांची सोय केली होती. याकरिता विशेषत: अगदी पाच फुटांपासून २५ फुटांपर्यंतच्या प्लास्टिकच्या पिशव्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत्या. यासह मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पावसाची तमा न बाळगता ढोलताशांच्या ठेक्यावर नृत्याचा फेर धरला; तर काही मंडळांनी मूर्तिकारांच्या दारातून थेट मंडळापर्यंत विनावाद्य ट्रॅक्टर-ट्रॉलीतून मूर्ती नेणे पसंत केले.