Kolhapur: दारूच्या नशेत मुलानेच केला आईचा खून; आईने एकटीने केला होता सांभाळ
By उद्धव गोडसे | Published: November 2, 2023 12:14 PM2023-11-02T12:14:42+5:302023-11-02T12:15:38+5:30
कागल : दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ...
कागल : दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने नशेत जन्मदात्या आईवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना वंदूर (ता. कागल) येथील वाईंगडे मळ्यात घडली. सुनीता अशोक वाईंगडे (वय ५२) असे या दुर्दैवी मातेचे नाव असून, संशयित नीलेश अशोक वाईंगडे (३०) यास अटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला.
याबद्दल अधिक माहिती अशी की, संशयित नीलेश वाईंगडेला दारूचे व्यसन आहे. अधूनमधून तो आईशी भांडत होता. बुधवारी दिवसभर तो दारूच्या नशेत होता. वंदूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकून रस्ताही रोकण्याचा प्रकार त्याने केला. रात्री दारूच्या नशेत आईचा खून केल्यानंतर तो नेहमीप्रमाणे अंगणात झोपला होता. सकाळी उठून पुन्हा दारू पिऊन आला आणि आईला उठवू लागला.
आई कोणताही प्रतिसाद देत नाही म्हणून त्यांने शेजारी राहणाऱ्या चुलत चुलत्यांना सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मद्यधुंद अवस्थेत त्याने आईच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केला. तसेच डोके भिंतीवर आपटून गळाही आवळला असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, सहायक पोलिस निरीक्षक निशिकांत गच्चे, शैलजा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
आईने एकटीने केला होता सांभाळ
आरोपी नीलेश हा ऊसतोडणी व अन्य शेतमजुरीची कामे करतो. घरची तीन एकर शेती आहे. सुनीता या शेती व म्हशी पाळून संसार चालवीत होत्या. संशयित नीलेश हा लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. त्यानंतर आईने एकटीने त्याचा सांभाळ केला होता. त्यांच्या शेजारीच चुलते, चुलतभाऊ राहतात. मनमिळाऊ स्वभावाच्या सुनीता यांच्या अशा निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.