सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

By admin | Published: April 28, 2015 10:24 PM2015-04-28T22:24:13+5:302015-04-28T23:46:56+5:30

बावड्यातील ६०० एकरांतील ऊस वाळणार : शेतकऱ्यांना करावी लागणार स्वत:ची ‘पाण्याची स्कीम’

Drying water from the sewage treatment center | सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून शेतीला पाणी बंद

Next

रमेश पाटील- कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र ‘एसटीपी’ नुकतेच सुरू झाल्याने जुना ‘एसटीपी’ बंद करण्यात आला आहे. परिणामी या सांडपाण्यावर १९७४ पासून उसाचे पीक घेणाऱ्या कसबा बावडा, कदमवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचा ६०० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस पाणी बंद झाल्यामुळे वाळत चालला आहे.
भविष्यात या ठिकाणी ऊस पिकवायचा झाल्यास शेतकऱ्यांना स्वत:ची पाण्याची सोय करावी लागणार असल्याची स्थिती आहे. अचानक सांडपाणी देण्याचे महापालिकेने बंद केल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
शहरातील जयंती नाला व कोल्हापूर शहराचे पूर्ण सांडपाणी कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर आणले जाते. १९७४ पासून ते आजतागायत या केंद्रातून फारशी प्रक्रिया न केलेले पाणी शेतकरी आपल्या उसाला देत होते. या दूषित पाण्यामुळे उसाचे तसेच अन्य इतर पिकांचे उत्पन्न कमी मिळत असे; परंतु दूषित का असेना परंतु पाणी मिळते म्हणून शेतकरी हे पाणी पिकाला देत होते. महापालिकेने दूषित पाणी शेतकरी घेतात म्हणून या पाण्याच्या भरवशावर श्रीराम सेवा संस्थेने धरणावरील या क्षेत्राची पाणीपुरवठा स्कीम बंद केली. या भागातील विहिरीचे नैसर्गिक जलस्त्रोतही बंद झाले आहेत.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जयंती नाल्यातील १०० टक्के दूषित पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सुरू झाले आहे. त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण काही प्रमाणात थांबले आहे.
प्रक्रिया केंद्रातील पाणी आता शेतकऱ्यांना मिळण्याचे बंद झाल्याने बावड्यातील अनेक शेतकरी आता चिंतातूर झाले आहेत. कारण सांडपाणी बंद झाल्याने अचानक नवीन कोणतीही पाण्याची योजना लगेचच राबवता येणार नाही. केर्लेकर मळा, सरकारी मळा, जामदार मळा, कदमवाडी, बिरंजे पाणंद, वेटाळे मळा, रेडेकर पाणंद, ठोंबरे मळा, प्रिन्स शिवाजी शाळेशेजारील परिसर आदी ठिकाणच्या ऊस क्षेत्रासाठी या सांडपाण्याचा उपयोग शेतकरी करत होते; परंतु आता पाणी पुरवठाच बंद झाल्याने ऊस वाळून जाणार आहे.


शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था करावी
कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे जुना एसटीपी सुरू करता येणार नाही. शेतीला पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था उभी करावी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पंचगंगेचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी महापालिका घेत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शेतीसाठी पाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही.
- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महानगरपालिका


आयुक्तांना बावड्यातील
शेतकरी भेटणार
शेतीसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी मिळावे, म्हणून लवकरच शेतकऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिवशंकर यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तसेच प्रसंगी आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार आहे. - रवींद्र रेडेकर, शेतकरी, कसबा बावडा

Web Title: Drying water from the sewage treatment center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.