योग्य किमतीसाठी दुहेरी कर हवा
By admin | Published: March 4, 2015 12:39 AM2015-03-04T00:39:26+5:302015-03-04T00:46:28+5:30
बुधाजीराव मुळीक : इतिहास विभागाच्या ‘शेती विकास’ चर्चासत्राला प्रारंभ
कोल्हापूर : शेतीला केंद्रस्थानी ठेवून आपल्या अर्थव्यवस्थेची आणि धोरणांची फेरमांडणी होणे गरजेचे आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनांची योग्य किंमत देण्यासाठी दुहेरी दर आकारणीचे धोरण आपल्याला आज ना उद्या स्वीकारावे लागेल. शेतीला प्राधान्य दिल्याखेरीज भारताला भवितव्य नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी मंगळवारी येथे केले. कार्यक्रम संपल्यानंतर वृत्तवाहिनीवर संवाद साधताना डॉ. मुळीक यांनी, शेतकऱ्यांनी आता आत्महत्या नव्हे, तर त्यासाठी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची हत्या केली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे आयोजित ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शेतीविकास’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी बीजभाषण करताना ते बोलत होते. ‘महाराष्ट्रातील शेती : काल, आज व उद्या’ असा त्यांच्या भाषणाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील होते.
डॉ. मुळीक म्हणाले, हरित, धवल, नीलक्रांती आणि हॉर्टिकल्चरद्वारे सप्तरंगी क्रांती अशा टप्प्यांनी शेतीचा विकास झाला. मात्र, हे क्षेत्र असंघटित राहिल्याने शेती व्यवसाय मागे पडला. शेती हा प्रत्येक घटकाचा आधार आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासन, प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. ते झाले नाही तर आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या व्यवस्थेची शेतकऱ्यांनी हत्या केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया डॉ. मुळीक यांनी व्यक्त केली.
डॉ. पाटील म्हणाले, ज्ञान, संपत्ती आणि प्रसिद्धी ही प्रगतीच्या मोजमापाची भौतिक साधने आहेत; पण प्रगतीचे खरे मोजमाप मानवतावादी मूल्यांच्या वृद्धीतून अधोरेखित होते. त्या दृष्टिकोनातूनच शेतीकडे पाहण्याची गरज आहे. यावेळी डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे, ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, आदी उपस्थित होते. अवनीश पाटील यांनी स्वागत केले. नीलांबरी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एम. ए. लोहार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘रोबोटिक्स’ हे शेतीचे भवितव्य
‘रोबोटिक्स’ हे भारतीय शेतीचे भवितव्य असणार आहे. प्रीसिजन फार्मिंगद्वारे प्रत्येक रोप हे युनिट मानून त्याला द्यावयाच्या खतांची, पाण्याची मात्रा निश्चित केली जाईल. जनावरांची धार यंत्रमानव काढतील. या सर्व गोष्टींसाठी आपली मानसिक, सामाजिक आणि राजकीय मनोभूमिका स्वीकारार्ह बनविण्याची गरज आहे, असे डॉ. मुळीक यांनी सांगितले.