आधुुनिकतेचा धागा विणणारा 'देवांग कोष्टी'
By Admin | Published: March 23, 2015 12:59 AM2015-03-23T00:59:38+5:302015-03-23T00:59:40+5:30
शहरात ३०० हून अधिक कुटुंबे : कोष्टी समाज युवा संघटनेकडून २३ वर्षांपासून सामाजिक उपक्रम---लोकमतसंगे जाणून घेऊ
सचिन भोसले - कोल्हापूर -पूर्वी विणकाम करणारा समाज म्हणून देवांग कोष्टी समाजाकडे पाहिले जात होते. मात्र, आता विणकाम हे केवळ मर्यादित लोकांची मक्तेदारी किंवा उदरनिर्वाह चालविण्याचा व्यवसाय न राहता, यामध्ये विविध तंत्रज्ञानाचा आविष्कार होऊन पारंपरिक व्यवसायाऐवजी यांत्रिक हातमाग आले आहेत. अशा विणकामाच्या व्यवसायात अन्य समाजातील लोकांसह कोष्टी समाजानेही पारंपरिक ओळख जपण्याचा प्रयत्न आजच्या काळात केला आहे.
सध्या समाजातील लोकांनी शिक्षण घेऊन अन्य व्यवसाय, नोकरीतही पुढारलेला समाज अशी नवी ओळख निर्माण केली आहे. पूर्वी कोष्टी समाजाचे लोक कोठे राहतात, तर ‘मंगळवार पेठेतील कोष्टी गल्ली’ एवढीच ओळख संपूर्ण कोल्हापूरला होती. अशा या देवांग कोष्टी समाजाबद्दल थोडे जाणून घेऊ लोकमत संगे.
संपूर्ण राज्यात अनादी काळापासून कोष्टी समाज हा विणकाम करणारा समाज म्हणून सर्वत्र परिचित होता. मात्र, कालांतराने समाजातील लोक अन्यत्र नोकरी-व्यवसायानिमित्त परराज्यांतही गेले. विशेषत: कोल्हापुरातील कोष्टी समाज हा मुख्यत: शहरालगतच्या आसपासच्या गावांत विखुरला. यात प्रामुख्याने इचलकरंजी, विटा, पेठवडगाव, कर्नाटकातील बेळगाव या गावांमध्ये अधिक प्रमाणात कोष्टी समाज दिसतो.
कोल्हापुरात केवळ कोष्टी गल्ली येथे चौंडेश्वरी मंदिर व पाडळकर मार्केट येथील कोष्टी समाजाच्या बोर्डिंग संस्थेच्या माध्यमातून आजही समाजउपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.
सर्वसाधारणपणे शहरात तीनशेहून अधिक देवांग कोष्टी समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत.
महिलाही समाजोपयोगी
कार्यात अग्रेसर
देवांग कोष्टी समाजाचा चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंगच्या माध्यमातून विकास होऊ लागला, तसतसा समाज एकत्रित येऊ लागला. त्यातून समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. मंदिरात दीपोत्सव, वर्धापनदिनानिमित्त महिलांच्या स्पर्धा, ज्ञानात भर घालण्यासाठी व्याख्याने
आयोजित केली जातात. ‘स्वयंसिद्धा’च्या कांचनताई परुळेकर यांच्या माध्यमातून समाजातील महिलांना
आपल्या पायावर उभे करण्यासाठी विविध गृहोपयोगी उद्योगांचे प्रशिक्षण दिले. यातून ‘ज्ञान, विज्ञान, शांती, स्फूर्ती समाजाला देऊ गती’ हे महिला मंडळाचे ब्रीदवाक्य आहे. महिलांनी तर टाकाऊपासून टिकावू वस्तू बनविल्या आहेत. याशिवाय पालक, मुले आणि सुसंवाद याविषयी जागृती दाखवत मुलांमध्ये चांगल्या संस्काराची पेरणी केली आहे. कोष्टी समाज महिला मंडळाची स्थापना १७ वर्षांपूर्वी केली आहे. लेक वाचवा अभियान, आदी उपक्रम सातत्याने वर्षभर राबवून समाजातील महिलांसोबत अन्य समाजांतील महिलांचेही प्रबोधन महिला मंडळामार्फत केले जाते.
राजर्षी शाहूंच्या दूरदृष्टीमुळे समाज पुढारला
कोल्हापुरात अनेक वर्षांपासून समाज आहे. मात्र, या समाजातील युवक शिक्षण घेऊन सुशिक्षित व्हावीत म्हणून छत्रपती शाहू महाराज यांनी इंग्लंडच्या धर्तीवर विविध समाजांतील युवकांसाठी हॉस्टेल, बोर्डिंगची सोय केली. प्रत्येक समाजाला बोर्डिंग स्थापनेसाठी पैसा, जागा दिली. यात कोष्टी समाजालाही गंगावेश येथील पाडळकर मार्केट येथे बोर्डिंगसाठी जागा दिली. यामुळे केवळ पारंपरिक व्यवसायात गुंतून न राहता युवकांनी शिक्षणाला महत्त्व दिले. आज समाजातील काही कुटुंबे सोडली, तर अन्य लोक नोकरी व अन्य व्यवसायांत प्रगती करून विविध पदांवर आणि उद्योगात अग्रेसर आहेत.
अन्य समाजातील अध्यक्ष
कोष्टी समाज अल्प असल्याने संस्थानकाळ व स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा काही काळ समाजाच्या कोष्टी समाजाव्यतिरिक्त समाजातील अर्थात मराठा समाजातील गणपतराव ऊर्फ रावसाहेब रावजी मंडलिक यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. समाजाचे उत्पन्न अल्प असल्याने कोष्टी गल्ली येथे समाजाच्या मालकीचे चौंडेश्वरी मंदिर होते. मात्र, त्याची देखभाल करणे कठीण होऊ लागले. पुढे रावसाहेब यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव न्यायाधीश शामराव मंडलिक यांची नियुक्ती झाली. पुढे तर गणपतराव रोडे, पंढरीनाथ म्हेतर, गणपतराव तारळेकर, आदी मंडळींनी समाजाची धुरा वाहिली. कालांतराने समाजाचे अध्यक्षपद नामदेवराव रोडे व उपाध्यक्ष बळिराम कवडे यांच्याकडे आले. या काळात समाजास बाळसे येऊ लागले.
समाजाची ओळख बदलली
पूर्वीच्या काळी हातावर विणकाम करणारा समाज म्हणून कोष्टी समाजाकडे पाहिले जात होते. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे समाजातील त्यावेळचा युवक शिकला. पुढे शिक्षण घेऊन तयार झालेल्या पिढीने समाजाच्या विकासासाठी अन्य व्यवसायाबरोबर सरकारी, खासगी नोकरी करीत आपली व समाजाची उन्नती साधली. शहरात तीनशेहून अधिक कुटुंबे देवांग कोष्टी समाजाची आहेत. याशिवाय पेठवडगाव, इचलकरंजी, बेळगाव, आदी ठिकाणी समाजबांधव मोठ्या प्रमाणात आहेत.
- विलास मकोटे, सचिव,
देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर
आम्ही राहू निर्भर
कोल्हापूर कोष्टी समाज युवा संघटनेची स्थापना २३ वर्षांपूर्वी झाली आहे. यात स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समाजातील युवकांनी घेतला आहे. त्यानुसार होळीविरोधी जनजागृती केली. याशिवाय रक्तगट संचयिका, वृद्धाश्रमातील वृद्धांशी संवाद साधणे, १० वी, १२ वीनंतर मार्गदर्शन शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन, समाजातील युवकांसाठी छात्रसेनेची माहिती, आदीचे आयोजन केले जाते. तसेच समाजाला उपयोगी येतील, असे उपक्रम, विज्ञाननिष्ठ कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने वर्षभरात कोष्टी समाज युवा संघटनेकडून केले जाते. आधुनिकतेची कास धरणाऱ्या विविध सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्यांना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन व्याख्यांनाच्या माध्यमातून दिले जाते.
समाजातील लोकांसाठी बसण्या-उठण्याचे स्थान व आद्यदैवी असणाऱ्या शाकंभरी व बनशंकरी या चौंडेश्वरी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प तत्कालीन संचालक महादेवराव बुचडे यांच्या हस्ते २९ मार्च १९८६ साली नारळ वाढवून करण्यात आला. पुढे मंदिर व समाजातील गरजू लोकांसाठी हॉल बांधण्यात आला. यामुळे समाजाची आर्थिक उन्नती झाली.
१९९८ पासून चौंंडेश्वरी मंदिरात पौष पौर्णिमा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याचबरोबर येथील हॉलचा वापर समाजासह अन्य समाजातील लोकांनाही अल्प दरात विवाह, बारसे, मुंज, आदी कार्यांसाठी उपलब्ध करून दिला जातो.