नजरेनेच रग ओळखणारे दादूमामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:30 AM2019-10-21T00:30:23+5:302019-10-21T00:30:27+5:30

कोल्हापूर : पैलवान दादू चौगले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत लालमातीशी नाळ तुटू दिली नाही. मोतीबाग तालमीत जावून ते रोज पैलवानांचा ...

A dudamama that recognizes the rug by sight | नजरेनेच रग ओळखणारे दादूमामा

नजरेनेच रग ओळखणारे दादूमामा

googlenewsNext

कोल्हापूर : पैलवान दादू चौगले यांनी अखेरच्या क्षणापर्यंत लालमातीशी नाळ तुटू दिली नाही. मोतीबाग तालमीत जावून ते रोज पैलवानांचा सराव घेत होते. त्याशिवाय विविध स्पर्धांना मल्लांची निवड करण्यातही त्यांचाच पुढाकार होता. कोणत्या पैलवानांमध्ये रग आहे हे त्यांना नजरेने कळत होते. त्यांचा स्वत:चा रोजचा चालण्याचा व्यायाम होता. शरीर बोजड (सुमारे १२५ किलो) झाले तरी प्रकृती अतिशय ठणठणीत होती. कुस्ती क्षेत्रामध्ये ‘दादूमामा’ अशीच त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.
तोडीस तोड नाही म्हणून गाव सोडले
राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा हे त्यांचे मुळगांव. मुलाला पैलवानच करायचं, या हट्टानं प्रसंगी पोटाला चिमटा घेत आई-वडिलांनी दादू चौगुले यांना खुराक दिला. वयाच्या दहाव्या वर्षीच कोल्हापूर जिल्ह्याातील राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड या छोट्याशा गावातील हा धट्टाकट्टा मुलगा आखाड्यात उतरला. छोट्या-छोट्या कुस्त्या मारणारा हा मुलगा वस्ताद गणपतराव आंदळकरांच्या मनात भरला. त्यांनी मोठी मेहनत करून घेत त्याला कुस्तीचे डावपेच शिकविले. पुढे हा पठ्ठा महाराष्ट्रात चमकला. बघता-बघता तो सत्पाल यांच्यासह उत्तरेतील बुरुजबंद मल्लांशी भिडू लागला. मिळालेल्या संधीचे सोने करताना अनेक मानाच्या गदा त्याने पटकावल्या. पैलवान आंदळकर, बाळासाहेब गायकवाड, बाळू बिरे यांच्या तालमीत घडलेल्या या पैलवानाने कोल्हापूरचा जरीपटका सर्वत्र मानाने फडकवत ठेवला.
आखाड्यातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी कुस्तीच्या वाढीसाठी सक्रिय योगदान दिले. ते कोल्हापूर शहर व जिल्हा तालीम संघाचे विद्यामान अध्यक्ष होते. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक मल्ल त्यांनी मेहनतीने घडविले. अखिल भारतीय कुस्तीगीर परिषदेशी चांगले संबंध ठेवत कोल्हापुरातील मल्लांना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेले. मुलालाही चांगला मल्ल घडविले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगा विनोद ‘हिंदकेसरी’ झाला. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांचा झालेला गौरव कुस्तीची प्रतिष्ठा वाढवणारा आहे.

कुस्तीबरोबरच व्यवसायात जम
कुस्तीचे धडे देत असतानाच चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी प्रथम जागा घेऊन त्याचे प्लॉट पाडून विक्रीचा व्यवसाय केला. त्यातही जम बसविल्यानंतर शहरासह उपनगरांत बांधकाम प्रकल्प उभे केले.
पंचाहत्तरीचे स्वप्नच राहिले
दादूमामा यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २०२१ साली मोठा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आतापासूनच मोतीबाग तालमीतील त्यांचे शिष्य संदीप पाटील, नितीन गायकवाड, अमोल पाटील, विजय पाटील, सरदार पाटील यांनी केले होते. त्यांनी ‘तसले काही नको,’ म्हणून सांगितले होते. जास्तच मनधरणी केल्यानंतर ‘ठीक आहे, करा तुम्हाला काय करायचे ते,’ असे सांगितले होते. मात्र, त्यांच्या अचानक जाण्याने शिष्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. त्याची चर्चा शिष्यांमध्ये सुरू होती.

Web Title: A dudamama that recognizes the rug by sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.