दूध संघ, जिल्हा बँकांच्या निवडणुका प्राधान्याने घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:34+5:302021-01-10T04:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील दूध संघ, साखर कारखाने व जिल्हा बँकांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या जाणार असून, त्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील दूध संघ, साखर कारखाने व जिल्हा बँकांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या जाणार असून, त्याची घोषणा येत्या आठ दिवसांत होणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्याने आता सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या तर यंत्रणेवर ताण येणार आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्या तरी राज्य शासन नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेत आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या सभासदांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात शासनाने दिलेली मुदतवाढ डिसेंबर २०२० ला संपली आहे. मुदत संपून दहा दिवस झाले तरी अद्यापही शासन पातळीवर निवडणुकांबाबत निर्णय झाला नाही. मार्च २०२१ नंतर निवडणुका घ्याव्यात असा काही मंत्र्यांचा आग्रह आहे, तर मार्चनंतर जेमतेम तीन-चार महिने मिळतात. त्यात पावसाळा सुरू झाल्याने प्रक्रिया थांबवावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुका आताच घेण्यासाठी काहींचा दबाव आहे. सहकारी निवडणूक प्राधीकरणाने निवडणूक तयारीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार दूध संघ, साखर कारखाने व जिल्हा बँकांच्या निवडणुका प्राधान्याने घेतल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतीसाठीचे मतदान १५ जानेवारी रोजी संपते. १८ जानेवारी रोजी मतमोजणी आहे. यानंतर कोणत्याही क्षणी ‘अ’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.