Everest Trekking : प्रतिकूल हवामानामुळे कस्तुरी कॅम्प चारवरून परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 01:56 PM2021-06-01T13:56:24+5:302021-06-01T13:59:06+5:30
Everest Trekking : तौक्ते व यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अनंत अडचणींवर मात करीत कोल्हापूरची वीस वर्षीय कस्तुरी सावेकरने अगदी कमी वयात एव्हरेस्टची लढाई जिंकली आहे. ताशी १८५ कि.मी.वेगाने वाहणारे वारे, हिमवर्षाव आणि एकूणच प्रतिकूल हवामानामुळे कॅम्प चारवरून तिला परतावे लागले. मात्र, इतक्या उंचीपर्यंत एव्हरेस्टला गवसणी घालणारी ती पहिली करवीरकन्या ठरली आहे. अशी माहिती तिचे वडील दीपक सावेकर व कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : तौक्ते व यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या अनंत अडचणींवर मात करीत कोल्हापूरची वीस वर्षीय कस्तुरी सावेकरने अगदी कमी वयात एव्हरेस्टची लढाई जिंकली आहे. ताशी १८५ कि.मी.वेगाने वाहणारे वारे, हिमवर्षाव आणि एकूणच प्रतिकूल हवामानामुळे कॅम्प चारवरून तिला परतावे लागले. मात्र, इतक्या उंचीपर्यंत एव्हरेस्टला गवसणी घालणारी ती पहिली करवीरकन्या ठरली आहे. अशी माहिती तिचे वडील दीपक सावेकर व कोल्हापूर माऊंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कस्तुरीच्या रुपाने कोल्हापुरात मिशन एव्हरेस्ट ही मोहीम व्यापक केली जाणार आहे. पदभ्रमंती, गिर्यारोहणातील नवोदितांना तिच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्याचा निर्णय यानिमित्त घेण्यात आला. जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करून आपल्या कवेत घेण्यासाठी कस्तुरीने दोन वर्षे खडतर तयारी केली होती.
गेल्या वर्षी तिची कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे मोहीम थांबली. त्यानंतर दुसरी लाटेतही अनेक अडचणींवर मात करीत ती १४ मार्चला एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचली. नियोजित मोहिमेनुसार २६ मे तिने एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला असता, पण त्यापूर्वीच तौक्ते व यास या दोन वादळामुळे एव्हरेस्टवर मोठ्या प्रमाणात वारे आणि हिमवर्षाव झाला.
तिने जिद्द न हारता तेथेच काही दिवस इतर गिर्यारोहक व शेर्पांसह संकटांना तोंड देत वेदर विन्डो मिळण्यासाठी मुक्काम केला. पण तिच्या सुरक्षिततेच्या कारणावास्तव पिंक प्रमोशन व स्थानिक प्रशासनाने कॅम्प चारवरून तिला माघारी येण्याची सूचना तिला व तिच्यासह इतर गिर्यारोहकांना केली.
या कालावधीत ती कॅम्प चारवरून तीनवर आणि पुन्हा कॅम्प दोनवर खाली आली. तेथेही अनेक संकटांना सामना करावा लागला. केवळ निसर्गाच्या रौद्ररुपामुळे तिला या मोहिमेतून माघार घ्यावी लागली. येत्या २०२२ ला पुन्हा ती एव्हरेस्ट सर करेल, असा विश्वासही या दोघांनी व्यक्त केला.
यावेळी करवीर हायकर्सचे अरविंद कुलकर्णी, कस्तुरीची आई मंजू सावेकर, प्रशिक्षक आनंदा डाकरे, उदय निचिते, विजय मोरे, विना मालदीकर, दिनकर कांबळे, विश्वनाथ भोसले, डॉ. दीपक आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेर्पांमुळे मोहिमेतून माघार
तिने पुन्हा एव्हरेस्टवर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील शेर्पांनी वातावरणामुळे येण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा तिला माघार घ्यावी लागली. ती एव्हरेस्टच्या कॅम्प दोनवर तीन, तर कॅम्प दोन वर पाच दिवस मुक्काम केला. या काळात विचार न करू शकणाऱ्या अडचणींना तिला तोंड द्यावे लागले, अशीही माहिती सावेकर, डॉ. अडके यांनी दिली.