खराब हवामानामुळे कस्तुरी सावेकर ‘कॅॅम्प तीन’वर परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:25 AM2021-05-26T04:25:31+5:302021-05-26T04:25:31+5:30
कस्तुरी ही सध्या ‘मिशन एव्हरेस्ट’ या मोहिमेवर आहे. कॅॅम्प तीनवरून मंगळवारी सकाळी कस्तुरी आणि अन्य ४० गिर्यारोहकांच्या टीमने कॅॅम्प ...
कस्तुरी ही सध्या ‘मिशन एव्हरेस्ट’ या मोहिमेवर आहे. कॅॅम्प तीनवरून मंगळवारी सकाळी कस्तुरी आणि अन्य ४० गिर्यारोहकांच्या टीमने कॅॅम्प चारच्या दिशेने चढाई सुरू केली. साधारणत: तीन तासाची चढाई करताना वारा प्रचंड वेगाने वाहू लागला. त्यामुळे गिर्यारोहकांना पुढे चढाई करणे अशक्य झाल्याने त्यांनी कॅॅम्प तीनवर माघारी येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे सर्व गिर्यारोहक कॅॅम्प तीनवर दुपारी एकपर्यंत सुखरूप पोहोचले. तौक्ते आणि आताचे बंगालच्या सागरातील यास चक्रीवादळाचा परिणाम एव्हरेस्टच्या वातावरणावर होत आहे. त्यामुळे हवामान खराब होत आहे. आज, बुधवारी आणि उद्या, गुरुवारी वाऱ्याचा वेग पाहून कस्तुरीसह अन्य गिर्यारोहक पुढील चढाई सुरू करणार आहेत; मात्र हे सर्व निसर्गावर अवलंबून असणार असल्याची माहिती कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांनी दिली.
चौकट
हेलिकॉप्टरने ऑक्सिजन सिलिंडर
काठमांडू (नेपाळ) येथील केशव पौडीयाल, गिरीप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे आणि बेसकॅम्पवरील लिडर बाबू शेर्पा यांनी कॅॅम्प तीनवरील मंगळवारच्या स्थितीची माहिती मोबाइलद्वारे दिली. त्यांनी सांगितल्यानुसार कॅॅम्प दोन आणि तीनवरील तंबू उडून गेले; मात्र सर्व गिर्यारोहक सुखरूप आहेत. कॅॅम्प तीनवरून शेर्पांनी बेसकॅॅम्पला खाद्यपदार्थ, जादाचा कृत्रिम ऑक्सिजन पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार बेसकॅॅम्पचे बाबू शेर्पा यांनी खाद्यपदार्थ पाठविले; मात्र बेसकॅॅम्पला ऑक्सिजन शिल्लक नव्हता. नेपाळमधून केशव पौडियाल यांनी हेलिकॉप्टरने जादा दहा ऑक्सिजन सिलिंडर पाठवून दिली.
चौकट
अभिनेता राहूल बोसकडून शुभेच्छा
कोल्हापूर आजोळ असलेल्या अभिनेता राहूल बोस यांनी कस्तुरी हिच्या ‘मिशन एव्हरेस्ट’ला शुभेच्छा दिल्या. फुटबॉलप्रमाणे अन्य धाडसी खेळांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या कोल्हापूर शहरातील कस्तुरी ही जिद्द आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर एव्हरेस्ट सर करेल, याची खात्री आहे. तिची ही कामगिरी कोल्हापूरसह महाराष्ट्राला अभिमानास्पद ठरेल. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या नात कांचन (कपूर) अनेजा यांनीही कस्तुरीला शुभेच्छा दिल्या असल्याचे त्यांनी या संदेशात म्हटले आहे. एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात कमी वयाच्या पूर्णा मालवाथ हिच्यावर अभिनेता बोस यांनी चित्रपट काढला होता.